पुनर्वसन-पुनःस्थापना योजना

‘सिडको'तर्फे विमानतळबाधितांना ४६ भूखंडांचे वाटप

नवी मुंबई : ‘सिडको'तर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प क्षेत्रातील प्रकल्पबाधित भूखंडधारकांना पर्यायी ४६ भूखंडांचे वाटप करण्यासाठी २२ जून २०२३ रोजी संगणकीय सोडत काढण्यात आली. या सोडती दरम्यान पुनर्वसन-पुनःस्थापना योजनेंतर्गत २३ आणि २२.५ % योजना अंतर्गत २३ याप्रमाणे एकूण ४६ भूखंडांचे वाटप भूखंडधारकांना करण्यात आले. सदर संगणकीय सोडत सिडको भवन येथे पार पडली.

या प्रसंगी ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील, शंतनु गोयल, मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, मुख्य अभियंता (नमुंआंवि) राजेंद्र धयाटकर, महाव्यवस्थापक (परिवहन-विमानतळ) गीता पिल्लई, मुख्य भूमी-भूमापन अधिकारी (नमुंआंवि) नवनाथ जरे, वरिष्ठ नियोजनकार (विमानतळ पुनर्वसन-पुनःस्थापना) स्मिता शिरोडकर, अतिरिक्त मुख्य भूमी-भूमापन अधिकारी (नमुंआंवि) उमेश पोटे, आदि अधिकारी उपस्थित होते.

‘सिडको'तर्फे पनवेल येथील १० गावांतील जमिनीचे संपादन करण्यात येऊन ११६० हेक्टरवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्यात येत आहे. या गावांतील प्रकल्पबाधित भूखंडधारकांना राज्य शासनाने मंजूर केलेले, देशातील सर्वोत्तम असे पुनर्वसन पॅकेज आणि अन्य लाभ २२.५ %  योजना अंतर्गत ‘सिडको'तर्फे देण्यात आले आहेत. तसेच विमानतळबाधितांकरिता सर्व भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक सुविधांनी सुसज्ज असे पुष्पक नगर नोड पुनर्वसन-पुनःस्थापना क्षेत्र (आर ॲन्ड आर) ‘सिडको'कडून विकसित करण्यात आले आहे.

परंतु, सदर वाटपित भूखंडांपैकी काही भूखंडांचे वाटप तांत्रिक कारणांमुळे रद्द करण्यात आले होते. या संबंधित भूखंडधारकांना २२ जून रोजी पार पडलेल्या संगणकीय सोडतीमध्ये पर्यायी ४६ भूखंडांचे वाटप करण्यात आले. एकूण ४६ पैकी २३ भूखंडांचे वाटप पुनर्वसन-पुनःस्थापना योजनेंतर्गत तर २३ भूखंडांचे वाटप २२.५ % योजना अंतर्गत करण्यात आले.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बाजारात टोमॅटो लालेलाल