मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
मेट्रो मार्ग क्र.१ ला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुवतांकडून प्रमाणपत्र प्राप्त
‘नवी मुंबई मेट्रो'ला ग्रीन सिग्नल
नवी मुंबई : ‘सिडको'च्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र.१ वरील सेंट्रल पार्क ते बेलापूर स्थानक या स्थानकांदरम्यान प्रवासी वाहतूक सुरु करण्याकरिता २१ जून २०२३ रोजी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) यांच्याकडून सीएमआरएस प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. यामुळे लवकरच बेलापूर ते पेंधर या संपूर्ण मार्ग क्र.१ वर प्रवासी वाहतूक सुरु होणार आहे.
दुसरीकडे सीएमआरएस प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी मार्ग क्र.१ वरील मेट्रो स्थानकांना भेट दिली.
‘सिडको'तर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत नवी मुंबईतील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी एकूण ४ उन्नत मेट्रो मार्ग विकसित करण्यात येत आहेत. त्यापैकी बेलापूर ते पेंधर या मार्ग क्र.१ च्या अंमलबजावणीचे काम सर्वप्रथम हाती घ्ोण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सिडको'तर्फे मार्ग क्र.१च्या अंमलबजावणीसाठी अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून ‘महा मेट्रो'ची नियुक्ती करण्यात आली आहे.
‘सिडको'च्या मेट्रो मार्ग क्र.१ च्या अंमलबजावणीसाठी ‘सिडको'ला आयसीआयसीआय बँकेकडून ५०० कोटी रुपयांचा वित्त पुरवठा प्राप्त झाला आहे. तसेच ‘सिडको'च्या २०२२-२३ या वर्षीच्या अर्थसंकल्पात मेट्रो प्रकल्पाकरिता समर्पित जमीन वाटपित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे प्रकल्पाचे चलनीकरण होऊन प्रकल्पासाठी वित्त पुरवठा सुकर होणार आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२१ मध्ये मार्ग क्र.१ वरील पेंधर ते सेंट्रल पार्क या ५ स्थानकांदरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरिता सीएमआरएस प्रमाणपत्र प्राप्त झाले होते. आता मार्ग क्र.१ वरील बेलापूर ते पेंधर स्थानकांदरम्यान प्रवासी वाहतूक सुरु करण्यासाठी सीएमआरएस प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. यामुळे लवकरच संपूर्ण मार्ग क्र.१ प्रवासी वाहतुकीकरिता कार्यान्वित होणार आहे.
नवी मुंबई मेट्रो लाईन-१च्या यशस्वी परिचालनासाठी सिडको सज्ज आहे. परिचालनाची सर्व व्यवस्था केली असून ‘महा मेट्रो'ची ऑपरेटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर मेट्रो प्रवासी दर निश्चित करुन कर्मचारी भरती देखील करण्यात आली आहे.
‘नवी मुंबई मेट्रो'च्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा सर झाला आहे. सीएमआरएस प्रमाणपत्र प्राप्त झाल्यामुळे नवी मुंबईकरांकरिता बेलापूर ते पेंधर मार्गिकेवर लवकरच मेट्रो सेवा सुरु होणार आहे. अनेक अडी-अडचणींवर मात करुन बहुप्रतिक्षीत अशी नवी मुंबई मेट्रो सेवा लवकरच सुरु होणार आहे. -अनिल डिग्गीकर, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको.