धोकादायक इमारती, घरांचा रहिवास आणि वापर तात्काळ थांबविण्याचे आदेश

नवी मुंबईत ५२४ इमारती धोकादायक; महापालिका तर्फे यादी जाहीर

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे सन २०२३-२४ या वर्षासाठी विभागवार सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणानंतर महापालिका क्षेत्रात एकूण ५२४ इमारती महाराष्ट्र महापालिका अधिनियमाचे कलम २६४ अन्वये धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत.

यामध्ये अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य आणि तात्काळ निष्कासित करणे अशा ‘सी-१' प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या ६१ इमारती तसेच इमारत रिकामी करुन संरचनात्मक दुरूस्ती करणे अशा ‘सी-२ ए' प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या ११४ इमारती आणि इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती करणे अशा ‘सी-२ बी' प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या ३०० इमारती त्याचप्रमाणे इमारतीची किरकोळ दुरुस्ती या ‘सी-३' प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या ४९ इमारती अशाप्रकारे एकूण ५२४ धोकादायक इमारतींची यादी घोषित करण्यात आलेली आहे.

सदर यादी नवी मुंबई महापालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटवर ‘विभाग' सेक्शनमध्ये ‘अतिक्रमण विभाग' माहितीच्या सेक्शनमध्ये अवलोकनासाठी सहज उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या यादीमध्ये अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य आणि तात्काळ निष्कासित करण्याच्या ‘सी-१' प्रवर्गामध्ये नमूद ६१ इमारतींची नावे आणि तपशील नागरिकांना सहज कळावा यादृष्टीने ठळक अक्षरात प्रसिध्द करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र महापालिका अधिनियमाचे कलम २६४ मधील तरतुदीच्या अनुषंगाने नोटीस प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार घोषित इमारतींमध्ये वास्तव्य करणारे मालक, भोगवटादार यांना ते राहत असलेली इमारत निवासी, वाणिज्य वापराकरिता धोकादायक असलेबाबत आणि या इमारतींमधील निवासी, वाणिज्य वापर तात्काळ थांबविणेबाबत तसेच धोकादायक इमारतींचे बांधकाम विनाविलंब तोडून टाकण्याबाबत महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग यांच्या कडील ५ नोव्हेंबर २०१५ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार लेखी सूचना, नोटीस देण्यात आलेल्या आहेत. ‘सी-१' प्रवर्गातील इमारतीची विद्युत आणि जलजोडणी खंडीत करण्यात येईल, असेही यात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे.
अशा धोकादायक घोषित करण्यात आलेल्या इमारतींचे मालक अथवा भोगवटादार यांनी ते रहात असलेल्या इमारतीचा वापर करणे धोकादायक असल्याने इमारत कोसळून जीवित आणि वित्त हानी होण्याचा शवयता आहे. सदर बाब लक्षात घ्ोऊन धोकादायक घोषित केलेल्या इमारतीचा, बांधकामाचा निवासी आणि वाणिज्य वापर त्वरित बंद करावा. सदरची इमारत, बांधकाम विनाविलंब तोडून टाकावे, असे सूचित करण्यात आलेले आहे. अशा प्रकारची कार्यवाही न केल्यास, सदर इमारत, बांधकाम कोसळल्यास होणाऱ्या नुकसानीस फक्त संबंधित जबाबदार असतील, नवी मुंबई महापालिका यास जबाबदार राहणार नाही, असे स्पष्ट आदेशच महापालिकेच्या वतीने जारी करण्यात आलेले आहे.
सदर नोटिसीमध्ये धोकादायक इमारतींच्या नावासमोर रहिवास वापर सुरु आहे अथवा नाही याचीही नोंद करण्यात आलेली आहे. इमारतीच्या वर्गीकरणानुसार इमारतींचा भोगवटा वापर, रहिवास करणाऱ्या नागरिकांनी इमारत तात्काळ निष्कासीत करावयाची आहे किंवा वर्गीकरणानुसार नमूद केल्याप्रमाणे इमारत रिकामी करुन संरचनात्मक दुरुस्ती करणे प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या भोगवटाधारकांनी इमारत दुरुस्त करुन आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. याबाबत कोणत्याही प्रकारे धोकादायक परिस्थिती उद्‌भवल्यास त्यास महापालिका जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वयात येणाऱ्या मुलींचे तसेच त्यांच्या पालकांचे समुपदेशन होणे आवश्यक - रुपाली चाकणकर