शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत चैन स्नॅचींग करणाऱ्या लुटारुंच्या कारवाया सुरुच
चैन स्नॅचर लुटारुंच्या कारवायांमध्ये वाढ
नवी मुंबई ः नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत चैन स्नॅचींग करणाऱ्या लुटारुंच्या कारवाया सुरुच असून, या लुटारुंनी वाशी आणि खारघर परिसरातील दोन महिलांच्या अंगावरील सुमारे २ लाख रुपये किंमतीचे दागिने लुटून नेल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्या आहेत. या लुटारुंचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असला तरी चैन स्नॅचींग करणाऱ्या लुटारुंच्या कारवायांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने महिला वर्गात त्यांची दहशत वाढली आहे. त्यामुळे या लुटारुंचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी महिला वर्गातून केली जात आहे.
खारघर सेक्टर-१० मधील कोपरा गाव येथे राहणारी विवाहिता श्रध्दा उमेश जाधव (वय-३१) ७ मे रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घरातून वॉकींगसाठी बाहेर पडली होती. यावेळी ती वॉकींग करत खारघर सेक्टर-८ मधील रेडक्लिफ शाळेच्या मैदानाजवळ गेली. त्यांनतर श्रध्दा जाधव त्याच ठिकाणी फुटपाथवर बसली होती. याचवेळी तिच्याजवळ आलेल्या एका लुटारुने तिच्या गळ्यातील ५०हजार रुपये किंमतीचे दीड तोळे वजनाची सोन्याची चैन खेचून रस्त्याच्या पलिकडे मोटारसायकल घेऊन उभ्या असलेल्या दोघा साथीदारासह ट्रिपल सिट लिटील वर्ल्ड मॉल दिशेने पलायन केले. यावेळी श्रध्दा उमेश जाधव हिने एका कार चालकाच्या मदतीने सदर लुटारुंचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदर लुटारु त्यांच्या हाती लागले नाहीत. त्यामुळे श्रध्दा जाधव हिने खारघर पोलीस ठाणे मध्ये जाऊन तक्रार दाखल केली.
कोपरखैरणे मध्ये राहणाऱ्या वंदना रामचंद्र पवार (वय-४०) यांना आपल्या मुळ गावी लग्नाच्या कार्यक्रमासाठी जायचे असल्याने त्या गत ३ मे रोजी रात्री सायन-पनवेल मार्गावरील वाशी पलाझा येथील बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभ्या होत्या. त्यावेळी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा लुटारुंपैकी पाठीमागे बसलेल्या लुटारुने वंदना पवार यांच्या गळ्यातील ३५ ग्रॅम वजनाचे सुमारे दिड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र खेचुन पलायन केले. यावेळी वंदना पवार यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत सदर लुटारु अंधारात पसार झाले. वंदना पवार यांना लग्नासाठी गावी जायचे असल्याने त्या तशाच आपल्या गावी गेल्या. त्यानंतर ८ मे रोजी त्या नवी मुंबईत परतल्यानंतर त्यांनी वाशी पोलीस ठाणे मध्ये तक्रार दाखल केली.
गेल्या महिन्यामध्ये देखील चैन स्नॅचींग करणाऱ्या लुटारुंनी अवघ्या चार दिवसांमध्ये ४ महिला आणि १ पुरुष अशा पाच जणांच्या अंगावरील लाखो रुपये किंमतीचे दागिने लुटून नेले होते. त्यानंतर या लुटारुंनी वाशी आणि खारघरमध्ये दोन महिलांचे दागिने लुटल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांकडून या लुटारुंचा शोध घेण्यात येत असला तरी, चैन स्नॅचींग करणाऱ्या लुटारुंच्या कारवायांमध्ये पुन्हा वाढ होऊ लागल्याने महिला वर्गात या लुटारुंची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे या लुटारुंचा बंदोबस्त करण्याची मागणी महिला वर्गातून होऊ लागली आहे. तसेच चेन स्नॅचींगच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांची देखील झोप उडाली आहे.