शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
प्रदुषणावरील उपाययोजनांसाठी आयआयटी-मुंबई कडून अभ्यास
कासाडी नदीला लवकरच नवसंजीवनी
नवीन पनवेल ः तळोजा मधील कासाडी नदीतील प्रदुषणाचा मुद्दा विविध स्तरांवर गाजत आहे. या नदीलगत असलेल्या कारखान्यांमुळे झालेल्या प्रदुषणावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. अशातच आता आयआयटी मुंबईच्या पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाने कासाडी नदी पुनर्जिवीत करण्याचा २३५ पानांचा अहवाल ‘महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ'ला सादर केला आहे. त्यामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या कासाडी नदीला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तळोजा एमआयडीसीतून वाहणाऱ्या कासाडी नदीचे पाणी प्रदुषित असल्याचा निष्कर्ष मुंबई आयआयटी या संस्थेने काढला आहे. ‘राष्ट्रीय हरित लवाद'ने दिलेल्या आदेशानंतर ‘एमआयीसी'मधील वेगवेगळ्या तीन ठिकाणांहुन नदीच्या पाण्याचे नमुने तपासण्यासाठी घेण्यात आले होते. या नमुन्यांची तपासणी केली असता पाण्यातील द्रवरुप ऑक्सिजनची घनता कमी झाली आहे. तसेच रसायनांचे प्रमाण वाढल्याने जलचरांना धोका निर्माण झाल्याचे निष्कर्ष काढला आहे.
नदीमुळे भूजल पिण्याअयोग्य...
कासाडी नदीचे स्वरुप मर्यादित नसून नदी पुढे तळोजा खाडीत वाहत जाते. त्यामुळे नदीतील प्रदुषित पाण्याच्या दुर्गंधीने किनाऱ्यावर असणाऱ्या वसाहतींमधील नागरिकांना आरोग्यविषयक तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. शिवाय कासाडी नदीतील पाण्यामुळे जलचर, पाण्यातील वनस्पती आदि सजीवांच्या जीवाला धोका पोहोचला आहे. तसेच नदीतील पाणी भूजल साठ्यात मिसळल्यामुळे पिण्याचे पाणी, माती प्रदुषित झाली आहे.
रंग बदलणारी नदी अशी ओळख...
पनवेल तालुक्यातील कासाडी महत्त्वाची नदी आहे. कासाडी नदी हंगामी स्वरुपाची आहे. त्यामुळे एकीकडे कडक उन्हामुळे धरणे कोरडी पडलेली असताना दुसरीकडे मात्र या नदीचे पात्र अनेक ठिकाणी ओले असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या नदीतील पाणी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या रंगाचे असल्याने रंग बदलणारी नदी अशी ओळख आहे.