शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
तळोजा मध्ये तलावाची भिंत कोसळली
तळोजा मध्ये काम सुरु असताना अचानक तलावाची भिंत कोसळली
खारघर ः तळोजा गावातील मुघल कालीन तलावाच्या सुशोभीकरणाचे काम पनवेल महापालिकेच्या माध्यमातून सुरु आहे. काम सुरु असताना अचानक भिंत कोसळ्याने ग्रामस्थाकडून संताप व्यक्त केला जात आहे.
तळोजा गावात मुघल कालीन तलाव आहे. या तलावात बाराही महिने मुबलक पाणी असते. दुसरीकडे पनवेल महापालिकेकडून जवळपास सात कोटी रुपये खर्च करुन तलावाचे सुशोभिकरणाचे काम केले जात आहे. तलावाच्या चोहोबाजुने भिंत उभारणीचे काम सुरु आहे. २७ एप्रिल रोजी दुपारी १२ च्या सुमारास काम सुरु असताना अचानक भिंत कोसळली. या भिंतीपासून काही अंतरावर कामगार असल्यामुळे जीवितहानी टाळली.
दरम्यान, तलावाची भिंत कोसळ्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. महापालिकेकडून निकृष्ट दर्जाचे काम सुरु असून, काम करताना अल्प प्रमाणात सिमेंटचा उपयोग केला जात आहे. तलाव सुशोभिकरणाच्या नावाखाली लूट सुरु असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करुन तलाव सुशोभिकरण कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थाकडून केली जात आहे.
तळोजा गावात तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे सुरु असल्याचे पत्र आठ दिवसापूर्वी महापालिका अधिकाऱ्यांना दिले होते. या संदर्भात महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेवून पुन्हा नव्याने काम करावे, अशी मागणी करणार आहे. -अजिज पटेल, ग्रामस्थ तथा माजी नगरसेवक, पनवेल महापालिका.
तलाव सुशोभिकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. सिमेंट खडीचा उपयोग नाममात्र केला जात असल्यामुळे भिंत कोसळली. -जुबेर पटेल, ग्रामस्थ.
तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार प्राप्त होताच सदर काम नव्याने करण्यात यावे, अशा प्रकारची नोटीस एजन्सीला देण्यात आली आहे. -संजय कटेकर, कार्यकारी अभियंता-पनवेल महापालिका.