शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
‘महावितरण'ची दिरंगाई बेतणार नागरिकांच्या जीवावर?
वीज वाहिन्यांना झाडांच्या फांद्याचा विळखा
वाशी ः पावणे, तुर्भे स्टोअर परिसरात ‘महावितरण'च्या वीज वाहिन्यांना झाडांच्या फांद्यांनी विळखा घातला आहे. या फांद्या वीज वाहिन्यांच्या संपर्कात येत असल्याने वीज प्रवाह थेट झाडामध्ये उतरुन नागरिकांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे ‘महावितरण'ने झाडांच्या फांद्याची तात्काळ छाटणी करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
पावसाळयात वीज वाहिन्यांवर झाडे कोसळून होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी महावितरण दरवर्षी मान्सून पूर्व वृक्ष छाटणी करीत असते. मात्र, यंदा एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडला तरी देखील ‘महावितरण'तर्फे पावणे, तुर्भे विभागात वृक्ष छाटणीला सुरुवात करण्यात आलेली नाही. येथील पावणे गांव, ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे स्टोअर येथे वीज वाहिन्यांना झाडांच्या फांद्यांनी विळखा घातला आहे. त्यामुळे झाडांच्या फांद्यांमध्ये वीज प्रवाह उतरल्यास नागरिकांना विजेचा धक्का लागून प्रसंगी जीवावर बेतू शकते.
तुर्भे स्टोअर परिसरात मोठी नागरी वस्ती आहे. याठिकाणी झाडांखाली नागरिकांची नेहमीच मोठी वर्दळ असते. अशीच परिस्थिती पावणे गावात देखील आहे. त्यामुळे ‘महावितरण'ने अशा झाडांची छाटणी करुन पुढील संभाव्य धोका टाळावा, अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे स्टोअर तसेच पावणे गांव आणि परिसरात झाडांच्या फांद्यानी वीज वाहिन्यांना विळखा घातला आहे. त्यामुळे या झाडांमधून वीज प्रवाह खाली उतरल्यास नागरिकांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे ‘महावितरण'ने वेळीच या फांद्यांची छाटणी न केल्यास आणि विजेच्या धक्क्याने कुठली जीवितहानी झाली तर ‘महावितरण'च्या अधिकाऱ्यांविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करु. -अरुण पवार, संस्थापक-अध्यक्ष मराठा प्रतिष्ठान, तथा वॉर्ड अध्यक्ष-प्रभाग क्रमांक २३, मनसे.
वीज वाहिन्यांखाली वाढणाऱ्या झाडांच्या फांद्यांची ‘महावितरण'तर्फे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी छाटणी करण्यात येते. त्यामुळे पावणे, तुर्भे स्टोअर येथे जर झाडांच्या फांद्या वीज वाहिन्यांना स्पर्श करीत असतील तर त्यांची तात्काळ छाटणी करण्याच्या सूचना संबंधित अभियंत्यांना देण्यात येतील. -राजाराम माने, अधीक्षक अभियंता-वाशी, महावितरण.