नवी मुंबई शहर सुरक्षेसाठीचा सीसीटीव्ही प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू होण्यास मे महिना उजाडणार

नवी मुंबई शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे चालू होण्यास मे महिना उजाडणार

तुर्भे ः नवी मुंबई शहर सुरक्षेसाठीचा सीसीटीव्ही प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू होण्यास मे महिना उजाडणार असल्याचे कंत्राटदार कंपनीच्या कामावरुन स्पष्ट झाले आहे. ‘टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड' कंपनी सीसीटीव्ही बसविण्याचे काम करत आहे. नवी मुंबई महापालिकेने मार्च-२०२३ अखेरपर्यंत कामाची मुदत वाढवून दिली होती. या मुदतीपर्यंत सीसीटीव्ही बसविण्याचे काम झाले नसल्याने आता कंपनीला दंड आकारण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली. ३२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा दंड कंपनीला लागण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई महापालिकेने ‘टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड' या कंपनीला ८ महिन्यांमध्ये १ सहस्र ५४० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे १४७ कोटी रुपये खर्चाचे काम दिले होते. मात्र, दिलेल्या मुदतीत सदर काम पूर्ण न झाल्याने मार्च-२०२३ अखेरपर्यंत काम पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली होती. महापालिकेच्या सर्व विभाग कार्यालयात त्या-त्या विभागातील परिस्थितीची माहिती होण्यासाठी स्क्रीन देण्यात येणार होती. मात्र, पोलीस आयुक्त यांनी सर्व पोलीस ठाण्यात स्क्रीन देण्यात यावी, अशी सूचना केली. त्यानुसार आता विभाग कार्यालयात देण्यात येणारे स्क्रीन रहित करुन सर्व पोलीस ठाण्यांना ते देण्यात येणार आहे.

सध्या नवी मुंबई शहरात बसवण्यात येत असलेल्या कॅमेऱ्यांमध्ये ९५४ स्थिर कॅमेऱ्यांचा तसेच ३६० अंशामध्ये गोलाकार चित्रण टिपणाऱ्या १६५ पीटीझेड कॅमेऱ्यांचा समावेश आहे. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने ९ थर्मल कॅमेरे बसवण्यात येत आहेत. याशिवाय पोलीस विभागाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असणारे ९६ इव्हिडन्स कॅमेरे २४ मुख्य ट्रॅफिक जंक्शनवर बसविण्यात येत असून, २८८ एएनपीआर म्हणजेच ॲटोमॅटीक नंबर प्लेट रेक्गनेशन कॅमेरे देखील बसवण्यात येत आहेत. या एएनपीआर कॅमेऱ्यांव्दारे स्वयंचलीत पध्दतीने वाहनांवरील नंबर प्लेट वाचन करता येणार आहे. सदर यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर सिग्नल तोडणाऱ्या तसेच वाहतुकीच्या इतर नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांच्या घरी थेट दंडात्मक चलन फोटोसह पाठवले जाणार आहे.

यासोबतच २४ ट्रॅफिक जंक्शनवर पब्लिक अनाउसमेंट सिस्टीम बसवण्यात येणार आहे. याव्दारे आपत्कालीन व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यावश्यक क्षणी नागरिकांकरिता सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून महत्वाच्या सूचना देणे शक्य होणार आहे.


नवी मुंबईतील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, मुख्य चौक, सिग्नल, नागरी वसाहतीमधील रस्ते, बस आगार, रेल्वे स्टेशन समोरील परिसर, रिक्षा स्टॅन्ड आदी अनेक ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम झाले आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे प्रणालीचा मुख्य केंद्रीय नियंत्रण कक्ष नवी मुंबई महापालिका मुख्यालय येथे चालू करण्यात आला असून, तेथील कार्यप्रणालीची विस्तृत माहिती महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी त्याठिकाणी भेट देत जाणून घेतली. सदर नियंत्रण कक्ष नवी मुंबई पोलीस आयुक्तालय येथील विशेष कक्षाशी जोडलेला असणार आहे. याशिवाय निरीक्षण कक्ष वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालय, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-१ कार्यालयातही असणार आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पहाटे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून भीषण अपघात