शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
व्यक्तिमत्व समृध्दीसाठी पुस्तक वाचन महत्वाचे -नामदेव काटकर
डॉ.आंबेडकर स्मारकात ‘जागर'मध्ये लेखक-पत्रकार काटकर यांचे व्याख्यान
नवी मुंबई ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या ‘जागर-२०२३' या व्याख्यानमालेतील दुसरे व्याख्यानपुष्प बीबीसी मराठी नवी दिल्लीचे प्रतिनिधी तथा लेखक नामदेव काटकर नामदेव काटकर यांनी ‘वाचायचं कशासाठी?' या विषयावर गुंफले. यावेळी समाजविकास विभागाचे उपायुक्त डॉ. श्रीराम पवार यांच्या शुभहस्ते लेखक, पत्रकार नामदेव काटकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी काय वाचावे, कशा पध्दतीने वाचावे याबद्दल माहिती दिली. पुस्तके निर्जीव दिसतात; मात्र ती खरी सजीव असतात, या अरुण टिकेकर यांच्या वाक्याचा आधार घेत नामदेव काटकर यांनी माणसांपेक्षा पुस्तके जास्त आधार देणारी असतात, असे मत व्यक्त केले.
आता साधने आणि माध्यमे बदलत आहेत, तंत्रज्ञान विकसित होत आहे. मात्र, पुस्तक वाचनाला पर्याय नाही असे सांगत नामदेव काटकर यांनी पुस्तक वाचनामुळे आपण किती अज्ञानी आहोत ते समजते आणि अधिक वाचनाची ओढ लागते. माणूस ज्ञानवंत होण्यासोबतच नम्र होत जातो अशा शब्दात वाचनाचे महत्व अधोरेखीत केले. पुस्तक वाचता तेव्हा तुम्ही कल्पना करु लागता, पुस्तके बौध्दिक मर्यादा आणि संकुचित विचारांच्या चौकटी मोडून टाकतात, पुस्तकांमुळे प्रश्न पडतात अशा विविध माध्यमांतून पुस्तके आपल्याला
समृध्द करत जातात, असे काटकर म्हणाले. कुतूहलाच्या प्रेरणेतून वाचन होते. बाबासाहेबांसारखा प्रगाढ ज्ञानी माणूस पुस्तकांसाठी घर बांधतो यामध्येच शुन्यातून विश्व निर्माण करणाऱ्या युगपुरूषाची महानता लक्षात येते. नवी मुंबई महापालिकेने उभारलेले डॉ. आंबेडकर स्मारक बाबासाहेबांच्या विचारांचे मुर्तीमंत रुप आहे, अशा शब्दात काटकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बाबासाहेबांचा पुतळा नसलेले आगळे-वेगळे स्मारक असून इथल्या प्रत्येक गोष्टीत बाबासाहेब दिसतात, असा अभिप्राय त्यांनी नोंदविला.
पुस्तक वाचनाच्या वेगवेगळ्या प्रेरणा असतात. काही लोक माहिती मिळविण्यासाठी वाचतात, काही अधिक माहिती घेण्यासाठी मार्गदर्शन म्हणून वाचतात. काही एखादी घटना, प्रसंग अथवा विषय याविषयी कुतूहल म्हणून वाचतात, तर काही समजून घेण्यासाठी वाचतात असे वाचनाचे विविध हेतू कथन करताना नामदेव काटकर यांनी समजून घेण्यासाठी वाचले पाहिजे, असे मत व्यक्त केले. समजून घेण्यासाठी वाचल्याने एखाद्या विषयावर चोहोबाजुनी वाचले जाते. त्यामुळे वाचन एकांगी न होता बहुश्रुत होते, असा वेगळा विचार त्यांनी यावेळी मांडला. श्रोत्यांनी संपूर्ण भरलेले सभागृह आणि स्मारकाबाहेरील एलईडी स्क्रिन समोरही श्रोत्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती अशा हाऊसफुल्ल गर्दीत संपन्न झालेल्या या व्याख्यानामध्ये नामदेव काटकर यांनी वाचनाच्या प्रेरणा, वाचनाचा उद्देश, वाचनाचा हेतू आणि वाचनाचे फायदे अशा विविध अंगांनी पुस्तक वाचनाचे महत्व सांगितले.
दरम्यान, दहावीपर्यंत एकही पुस्तक न वाचलेला तसेच न्यूनगंडातून वाचू लागलो असे म्हणणारा केवळ ३० वर्षाचा युवक बीबीसी मराठी सारख्या जगप्रसिध्द वृत्तसंस्थेत कार्यरत राहून सातत्याने विविध विषयांवरचे वाचन करतो, वाचलेले इतरांना सांगण्याची प्रेरणा जपतो या कुतूहलाने नामदेव काटकर यांना ऐकण्यासाठी श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही श्रोत्यांनी विचारलेल्या पुस्तक वाचनाविषयीच्या प्रश्नांना देखील नामदेव काटकर यांनी दिलखुलास उत्तरे दिली.