‘पुनाडे आठगांव पाणी कमिटी'कडून जलजीवन योजनेच्या कामांचा आढावा

कमिटीची ‘जीवन प्राधिकरण'च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

उरण : उरण तालुक्यात विविध ठिकाणी ‘जलजीवन योजना' अंतर्गत कामे सुरु असून ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे सदर कामे अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत पडलेली आहेत. उरण तालुक्यातील पुनाडे धरणातून या भागातील ८ गावांसाठी सुमार ९ कोटी ८९ लाख रुपयांची जलजीवन योजना राबविण्यात येत आहेत. मात्र, कामे अर्धवट अवस्थेत असल्याने ‘पुनाडे आठगांव पाणी कमिटी'ने या बाबत ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरण'कडे तक्रारी केल्या होत्या.

त्या अनुषंगाने २१ ऑवटोबर रोजी ‘पुनाडे आठगांव पाणी कमिटीेने ‘जनजीवन मिशन'ची सुरु असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी ‘जीवन प्राधिकरण'चे पनवेल येथील मुख्य कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता आणि ठेकेदार यांची भेट घेतली. यावेळी ‘पुनाडे आठगांव पाणी कमिटी'च्या अध्यक्षा तथा वशेणी गावच्या सरपंच सौ. अनामिका म्हात्रे, ‘कमिटी'चे माजी उपाध्यक्ष मुकुंद गावंड, ‘सारडे'चे सरपंच रोशन पाटील, ‘पिरकोन'चे सरपंच कलावती पाटील, माजी सरपंच तथा ‘कमिटी'चे खजिनदार के. वाय.गावंड, माजी सरपंच संदीप पाटील, सदस्य समाधान म्हात्रे, सदस्य रसिक पाटील या सर्वानी ‘प्राधिकरण'च्या अधिकाऱ्यांना कामातील त्रुटी दाखवून दिल्या. काम करताना पिरकोन, पाले, आवरे, वशेणी, सारडे यासह इतर गावातील रस्ते खराब झाले आहेत. ते रस्ते त्वरित रस्ते दुरुस्त करुन द्यावेत.

तसेच पिरकोन, वशेणी मुख्य पाईपलाईनचे काम, सारडे खाडीतून येणाऱ्या पाईप लाईनचे काम, योजनेतील सर्व गावातील पाईप लाईन आणि वाढीव पाईप लाईनची कामे अशी सर्व काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची आग्रही मागणी यावेळी ‘कमिटी'ने केली. तसेच सदर कामे लवकर न झाल्यास आमदार महेश बालदी यांच्या मार्फत आवाज उठविण्यात येईल, असा इशाराही ‘जीवन प्राधिकरण'च्या अधिकाऱ्यांना देण्यात आला.

यावेळी बैठकीमध्ये ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरण'चे वरिष्ठ अभियंता पांढरपट्टे, उप अभियंता नामदेवराव जगताप यांनी ‘पुनाडे आठगांव पाणी कमिटी'च्या पदाधिकाऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

संगीतभूषण पं. राम मराठे यांचे घाणेकर नाट्यगृह येथे तैलचित्र