संगीतभूषण पं. राम मराठे यांचे घाणेकर नाट्यगृह येथे तैलचित्र

तैलचित्राचे पं. विश्वनाथ कान्हेरे, पं. ओंकार गुलवाडी, विजय गोखले यांच्या हस्ते झाले अनावरण

ठाणे : चतुरस्त्र गायक आणि ठाणे भूषण पं. राम मराठे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांच्या तैलचित्राचे अनावरण २३ ऑक्टोबर रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले. पं. मराठे यांच्यासह काम केलेले ज्येष्ठ ऑर्गनवादक पं. विश्वनाथ कान्हेरे आणि ज्येष्ठ तबला वादक पं. ओंकार गुलवाडी तसेच निर्माते, अभिनेते आणि सेन्सॉर बोर्डाचे सदस्य विजय गोखले यांच्या हस्ते पं. राम मराठे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.

ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात पं. राम मराठे यांचे चिरंजीव संजय मराठे, मुकुंद मराठे, मुलगी सुशीला ओक, जावई रघुवीर ओक आणि कुटुंबीय, तसेच, ज्येष्ठ कलाकार मारुती पाटील, पं. मुकुंदराज देव, पं. विवेक सोनार, गायिका हेमा उपासनी, रवी नवले, पं. राम मराठे यांचे तैलचित्र साकारणारे चित्रकार किशोर नादावडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पं. राम मराठे यांची जन्मशताब्दी २३ ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. यो औचित्य साधून पं. राम मराठे यांच्या तैलचित्राचे अनावरण ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले. त्यासाठी पं. कान्हेरे बुवा आणि पं. ओंकार गुलवाडी यांच्यासारखे ज्येष्ठ कलाकार तसेच ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले उपस्थित होतेे. सदरची बाब सांस्कृतिक ठाणेसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. पं. राम मराठे यांच्या गाण्यांची मोहिनी आजही कायम आहे, असे ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यावेळी म्हणाले.

तर, आजचा दिवस भाग्याचा आहे. पितृतुल्य गुरुजी पं. राम मराठे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्याचे भाग्य मला लाभले, त्यांच्यासह काम करण्याचा मान मिळाला. त्यांनी मला घडवले. खूप मोठा कलाकार, चतुरस्त्र गायकाचे ठाणे येथे निवासस्थान होते, ते ठाणेकरांचेही भाग्य आहे, अशा भावना पं. विश्वनाथ कान्हेरे यांनी व्यक्त केल्या. प्रयोग संपल्यावर जेवायला बसलो की ते दहीभात स्वतः कालवून खाऊ घालायचे. माझ्यावर त्यांनी पृतवत प्रेम केले, असेही कान्हेरे यांनी सांगितले.

संगीतभूषण, अखिल संगीत विश्वाचे गानवैभव असलेले पं. राम मराठे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्याचे ठाणे महापालिकेने योजले ती सर्व संगीत प्रेमींसाठी अतिशय आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे. पं. राम मराठे यांच्या लोकिकाला साजेसे भव्यदिव्य स्मारक ठाण्यात उभे रहावे. अधिकारी मंडळींनी त्याबद्दल विचार करावा, अशी सूचना ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांनी केली. रंगशारदा या गोखले यांच्या निर्मिती संस्थेच्या नाटकात पं. राम मराठे यांनी भूमिका केल्या होत्या.

यावेळी अतिरिक्त आयुक्त (संदीप माळवी यांच्या हस्ते पं. विश्वनाथ कान्हेरे, पं. ओंकार गुलवाडी, विजय गोखले, संजय मराठे, मुकुंद मराठे, सुशीला ओक आणि चित्रकार किशोर नादावडेकर यांचा सत्कार करण्यात आला. मुकुंद मराठे यांनी नाट्यगीताची झलक सादर करीत या छोटेखानी सोहळ्याची सांगता केली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘मेट्रो'चे उद्‌घाटन पुन्हा रखडले