महापालिका आयुवतांकडून नवी मुंबईतील कामांचा आढावा

पार्कींग धोरण मसुदा करण्यासाठी वाहतूक पोलीस, आरटीओ सोबत बैठक - नार्वेकर

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या बांधकाम पूर्ण झालेल्या विनावापर इमारती वापरात आणण्याच्या दृष्टीने जलद आणि कालबध्द कार्यवाही करावी. तसेच मार्केटमधील गाळ्यांच्या आणि ओटल्यांच्या वितरणाची कार्यवाही तत्परतेने पूर्ण करावी. दिवाळी सणापूर्वी या कार्यवाहीचा जागानिहाय अहवाल सादर करावा, असे निर्देश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी  विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत दिल्या. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, विजय कुमार म्हसाळ आणि सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

सदर बैठकीत महापालिकेच्या प्रत्येक विभागाच्या सुरु असलेल्या कामांचा विस्तृत आढावा घेताना आयुक्त नार्वेकर यांनी प्रत्येक कामाची बारकाईने माहिती घेतली. मार्केट मधील जागा वाटपाचा प्रलंबित विषय मार्गी लावण्याच्या दृष्टीने मार्केटचा विभागनिहाय आढावा घेत संबधित नोंदणीकृत फेरीवाल्यांना जागा वाटप करण्यासोबतच रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले हटविण्याची मोहीमही अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे ज्या मार्केटची बांधकामे सुरु आहेत त्यांना गती देऊन ती लवकरात लवकर पूर्ण करावीत, असेही आयुक्तांनी निेर्देशित केले.

अशाचप्रकारे विविध प्रयोजनासाठी महापालिकेने बांधलेल्या इमारती वापरात येण्याच्या दृष्टीने कालबध्द आणि गतीमान कार्यवाही करावी. या कार्यवाहीच्या अंमलबजावणीत हलगर्जीपणा केला जात असल्याचे आढळल्यास संबधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असे आयुवत नार्वेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

आता शाळांना १० ते २७ नोव्हेंबर दरम्यान दिवाळीची सुट्टी लागणार असून या कालावधीत शाळा इमारतीत काही स्थापत्य दुरुस्ती कामे करावयाची असल्यास ती शिक्षण विभागाने अभियांत्रिकी विभागाशी समन्वय साधून करुन घ्यावीत. १० नोव्हेंबर पासून शाळांची दिवाळी सुट्टी सुरु होत असल्याने तत्पूर्वी उद्यानांमधील खेळणी दुरुस्ती आणि आवश्यक कामे पूर्ण  करावीत. शहरातील विविध पाच उद्यानांमध्ये सुरु असलेल्या टॉयट्रेन दिवाळी सुट्टीपूर्वी कार्यरत होऊन त्याचा मुलांना आनंद घेता येईल, याकडे लक्ष द्यावेे. वंडर्स पार्क मधील आवश्यक कामे पूर्ण करुन घ्यावीत. १५ ऑक्टोबर पासून वंडर्स पार्क पावसाळ्यानंतर पुनःसुरु झाला असून तो संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहील याकडे विशेष लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचित केले.

कोपरखैरणे, सेक्टर-१४ आणि सेक्टर-१६ येथील नागरी आरोग्य केंद्रांची बांधकामे जलद पूर्ण करावीत. कोपरखैरणे आणि दिघा येथील रुग्णालयांची तसेच जुईनगर-शिरवणे येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाचे बांधकामही गतीमानतेने आणि गुणवत्ता राखून पूर्ण करावेत. सायन्स पार्क, स्वच्छता पार्क, वाशी बस डेपो आणि सेक्टर-२६ वाशी येथील एनएमएमटी संकुलांची बांधकामे, मोरबे सोलार पॅनल  प्रकल्प, घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, यांत्रिकी वाहनाव्दारे सफाई, सेन्ट्रल पार्क येथील तरणतलाव अशा विविध बाबींचा आढावा घेत आयुक्तांनी मौलिक सूचना केल्या.

दरम्यान, सदर बैठकीत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सीसीटिव्ही प्रकल्प तसेच लिडार सर्व्हेक्षण यांचाही आढावा घेत त्यामधील अडचणी दूर करुन ते जलद पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. कोणतेही काम त्याची कालमर्यादा ठरवून पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच या बैठकीत दिलेल्या निर्देशांवर केलेल्या कार्यवाहीचा प्रगती अहवाल घेऊन पुढील बैठकीत उपस्थित रहावे, असेही त्यांनी आदेशित केले.

पार्कींग धोरण नवी मुंबई शहर नियोजनातील अत्यंत महत्वाचा विषय असून त्याच्या मसुद्याला अंतिम स्वरुप देण्यासाठी वाहतूक पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग यांच्यासह त्वरित बैठक बोलावून धोरणाच्या अंमलबजावणीला गती द्यावी. सीबीडी, सेवटर-१५ येथे बांधण्यात येत असलेल्या मल्टीस्टोरेज वाहनतळाचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन तो काय्रान्वित करावा. या सोबतच सीबीडी-बेलापूर येथील आणखी एक वाहनतळाचा भूखंड वापरात यावा यादृष्टीनेही संबंधित अधिकाऱ्यांनी जलद कार्यवाही करावी. -राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘पुनाडे आठगांव पाणी कमिटी'कडून जलजीवन योजनेच्या कामांचा आढावा