हरित कचरा उचलणाऱ्या वाहनांचा अवैध वृक्ष तोडीमध्ये सहभाग?

नवी मुंबई शहरात बेकायदा वृक्ष तोडीचे सत्र कायम

वाशी : नवी मुंबई शहरात बेकायदा वृक्ष तोडीचे सत्र सुरु आहे. मात्र, सदर वृक्षतोडी मध्ये हरित कचरा उचलणाऱ्या वाहनांचा प्रत्यक्ष सहभाग दिसून येत आहे. त्यामुळे बेकायदा वृक्ष तोडीत सहभाग घेतल्याबाबत नवी मुंबई महापालिका घनकचरा विभागाने कारणे  दाखवा नोटीस बजावून तात्काळ खुलासा मागवला आहे.

नवी मुंबई शहरातील हरित कचरा (ग्रीन वेस्ट) उचलण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने कंत्राटदार नेमले आहेत. या कंत्राटदारांच्या वाहनांतून हरित कचरा उचलला जातो. मात्र, या वाहनांचा अवैध वृक्ष तोडीत सहभाग असल्याचे समोर येत आहे. नुकतीच कोपरखैरणे  सेक्टर-८ मध्ये अवैध वृक्षतोड करण्यात आली होती. मात्र, सदर वृक्षतोड होत असताना त्या ठिकाणी महापालिका घनकचरा विभागाचे वाहन उभे होते. याच वाहनातून येथील तोडलेल्या झाडांची वाहतूक करण्यात आली असून, त्या झाडांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. तर मागील आठवड्यात एमआयडीसी भागात देखील अवैध वृक्षतोडीचा प्रकार घडला आहे. त्यामुळे नवी मुुंबई शहरातील अवैध वृक्ष तोडीत महापालिका घनकचरा विभागातील ठेकेदाराचा प्रत्यक्ष सहभाग दिसून येत आहे. कोपरखैरणे सेक्टर-८ मधील अवैध वृक्ष तोड करणाऱ्या विरोधात महापालिका उद्यान विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यापाठोपाठ आता घनकचरा विभाग देखील सतर्क झाला असून, अवैध वृक्ष तोडीत सहभाग घ्ोतल्याबाबत सबंधित ठेकेदारास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसमध्ये तात्काळ खुलासा मागवण्यात आला आहे, अशी माहिती कोपरखैरणे विभागातील स्वच्छता निरीक्षकांनी दिली.

महापालिकेच्या नावाचा गैरवापर?
नवी मुंबई शहरात शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड केली जाते. मात्र, या वृक्षतोडीतील लाकडांची आणि फांद्यांची विल्हेवाट लावण्यात नवी मुंबई महापालिका घनकचरा विभागातील वाहने मोलाची भूमिका बजावत असल्याचे दिसून येत आहे. या वाहनांवर नवी मुंबई महापालिकाची पाटी असल्याने वृक्षतोड महापालिका करीत असल्याचा सर्वसामान्य नागरिकांचा समज होतो. त्यामुळे अवैध वृक्षतोड करताना संबंधित ठेकेदारांकडून नवी मुंबई महापालिकेच्या नावाचा गैरवापर होत असल्याचे चित्र दिसत आहे. 

-
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

३० वर्षापेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रवचरल ऑडीट करा; अन्यथा कारवाई