अनधिकृत बांधकाम प्रकरण

कर्तव्यात कसूर करणारे महापालिका विभाग अधिकारी उपायुक्तांच्या रडारवर?

तुर्भे : नवी मुंबई शहरातील वाढती अनधिकृत बांधकामे, मोकाट सुटलेले फेरीवाले यामुळे नवी मुंबई शहराची बजबजपुरी झाली आहे. याप्रकरणी न्यायालयाने देखील वारंवार नवी मुंबई महापालिका प्रशासनावर देखील ताशेरे ओढले आहेत. याची नोंद घेत तसेच यापूर्वीच्या अनेक परिपत्रकांचा आधार घेत महापालिका उपायुवत (अतिक्रमण विभाग) डॉ. राहुल गेठे यांनी महापालिका विभाग अधिकाऱ्यांना  कर्तव्यापासून कसूर केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावायला सुरुवात केली आहे.

नवी मुंबई शहर ‘सिडको'ने वसवलेले सुनियोजित शहर आहे. या शहरांमध्ये किती लोकसंख्याला किती किरकोळ, घाऊक मार्केट असावीत तसेच किती दैनंदिन (फळ, भाजी) मार्केट असावीत, आदी निकष ठरले आहेत. इतकेच नव्हे तर एखाद्या रहिवासी वसाहतीमध्ये किती घरे असावीत, त्यानुसार तेथील पायाभूत सुविधा, रस्ते, गटार आदीच्या सुविधा कशा असाव्यात हेही ठरले होते. त्यानुसार ‘सिडको'ने नियोजित नवी मुंबई शहर वसवलेले आहे. मात्र, आता नवी मुंबई शहराला अनधिकृत बांधकामांचा विळखा पडला आहे. यामध्ये उत्पन्न गटातील घरे बहुमती झाली आहेत. गावठाणातील घरे ६ मजली झाली आहेत. इतकेच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठी ओळखली जाणारी वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) या बाजार समिती आवारातील सर्व गाळेधारकांनीही त्यांच्या गाळ्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करुन सदर जागा भाड्याने दिली आहे. एकापेक्षा बहुमतली झोपड्या झाल्या आहेत. त्याचप्रमाणे नवी मुंबई शहरातील असा एकही रस्ता नाही की जिथे फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले नाही. शाळा, महाविद्यालय,  आलिशान उपहारगृह, रुग्णालय, रहिवासी सोसायटी यामध्येही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत.

महापालिका अतिक्रमण विभागाचे तत्कालीन उपायुक्त अमरीश पटनीगिरे यांच्या काळात नवी मुंबई शहरात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात फोफावली. पटनीगिरे यांच्याकडे अनेक वर्षे अतिक्रमण विभागाचा पदभार होता. नुकतेच एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेला चांगलेच फटकारले आहे. सदर संदर्भ घेत नवनियुक्त महापालिका उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांनी कारवाईचा बुलडोझर चालवायला घेतला आहे. यामध्ये, नवी मुंबई शहरातील अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिलेल्या, कार्यकाळात सर्वाधिक बेकायदा बांधकामे झालेल्या महापालिका अधिकाऱ्यांची कुंडली तयार करण्यात आली आहे. याशिवाय मोकाट फेरीवाले, चालू असलेली अनधिकृत बांधकामे यांविषयी खुलासा सादर करण्यात यावा, अशी कारणे दाखवा नोटीस महापालिका तुर्भे विभाग अधिकारी भरत धांडे यांना बजावली आहे.

शाळांची मैदाने शाळा वेळेच्या व्यतिरिक्त स्थानिक मुले-मुलींनी खेळण्यासाठी खुली ठेवण्याचे आदेश असताना, ज्या शाळांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली होती, ती मैदाने महापालिका अतिक्रमण विभागाचे अधिकारी खुली करुन देणार आहेत. पुढच्या टप्प्यात मॉल, शाळा, महाविद्यालय, अलिशान उपहारगृह, रुग्णालय, रहिवाशी टॉवर देखील अतिक्रमण विभागाच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे एकेकाळी मुंबईतील अतिक्रमणांचा कर्दनकाळ म्हणून गो. रा. खैरनार यांची ख्याती होती. त्यांची झलक नवी मुंबईमध्ये येत्या काळात पहावयास मिळणार आहे, अशी चर्चा आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शहिदांना नवी मुंबई पोलिसांचे अभिवादन