महापालिका अभियंता स्वप्निल देसाई यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध प्रसिध्द

आयुवत नार्वेकर, शहर अभियंता देसाई यांच्यासह सर्व स्तरांतून अभिनंदन

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे अभियंता स्वप्निल देसाई यांचा महापालिकेच्या मलनिःस्सारण व्यवस्थापनावरील शोधनिबंध इंटरनॅशनल रिसर्च जर्नल ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी  यासारख्या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिध्द झालेला असून त्याबद्दल महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी यांचे कौतुक केले आहे.

जल व्यवस्थापन आणि मलनिःस्सारण व्यवस्थापन या क्षेत्रातील १५ हून अधिक वर्षांचा अनुभव असणारे अभियंता स्वप्निल देसाई यांच्या अनुभवाचा उपयोग नवी मुंबई महापालिकेत विविध कामांमध्ये होत आहे. अत्यंत अभ्यासूपणे आणि कर्तव्यनिष्ठेने उत्तम कामगिरी करणारा अभियंता अशी त्यांची ओळख असून त्यांनी २० हून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतला आहे. तसेच आपले अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केले आहेत.

मॅकेनिकल इंजिनिअर असलेल्या स्वप्निल देसाई यांनी एनर्जी टेक्नॉलॉजीमध्ये एम.टेक. केलेले असून सद्यस्थितीत ते पर्यावरण अभियांत्रिकी (सांडपाणी) या विषयात पीएचडी करीत आहेत.

इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स इंडिया, इन्स्टिट्यूट फॉर इंजिनियरींग रिसर्च अँड पब्लिकेशन, इंडियन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स, आयएसआरपी मलेशिया, इंटरनॅशनल सोलार इंजिनियरींग सोसायटी जर्मनी अशा अनेक प्रतिथयश संस्थांचे देसाई सन्माननीय सदस्य असून त्यांना आय कॅन फाऊंडेशन कडून नॅशनल एज्युकेशन ब्रिलियन्स ॲवॉर्ड, आयएनएससी-बंगलोर यांच्याकडून रिसर्च एक्सलन्स ॲवॉर्ड, एसआयएसआरपी-चेन्नई यांच्यातर्फे इनोव्हेटिव्ह रिसर्चर अँड डेडिकेटेड एक्सलंट प्रोफेशनल ॲचिव्हमेंट अवॉर्ड असे अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

सातत्याने नाविन्याचा ध्यास घेत नवनवे तंत्रज्ञान शिकत राहणे अशी स्वप्निल देसाई यांची अंगभूत आवड असून त्यादृष्टीने ते सांडपाणी प्रक्रिया आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधनात्मक उच्च प्रशिक्षण सातत्याने घेत आलेले आहेत.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक ख्यातनाम संशोधनपर नियतकालिकांत देसाई यांचे अनेक शोधनिबंध यापूर्वीही प्रसिध्द झाले असून आता इंटरनॅशनल रिसर्च जनरल ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत स्वप्निल देसाई यांचा ‘नवी मुंबई, महाराष्ट्र येथे अमृत मिशन अंतर्गत औद्योगिक उपयोगी दर्जाचे पाणी निर्मिती करण्यासाठी अल्ट्रा फिल्टरेशन टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टचे डिझाईन आणि व्यवहार्यता यांचे विश्लेषण' या विषयावरील शोधनिबंध प्रसिध्द झाला आहे. त्यांच्या या गुणवत्तापूर्ण यशामुळे नवी मुंबई महानगरपालिका अभियांत्रिकी विभागाच्या नावलौकिकातही लक्षणीय भर पडलेली आहे. याबद्दल महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनीही त्यांचे कौतुक केले असून त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘बंगाली असोसिएशन'तर्फे ‘शारदोत्सव'चे आयोजन