नगरपरिषदांमधील माती एकत्रीकरण कार्यक्रम संपन्न

दिल्लीतील अमृतवाटिकेत ठाण्यातील माती जाणे अभिमानास्पद - जिल्हाधिकारी शिनगारे

ठाणे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर सुरु असलेल्या ‘माझी माती माझा देश' (मेरी माटी मेरा देश) उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील नगरपरिषदांमधून गोळा केलेल्या मातीचे एका अमृत कलशामध्ये एकत्रीकरणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या उत्साहात आणि वीरश्रीयुक्त वातावरणात पार पडला.  

ठाण्यातील मातीचा सुगंध राजधानी दिल्लीतील अमृतवाटिकेत बहरणार आहे. या ऐतिहासिक घटनेचे आपण भाग आहोत, ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचे प्रतिपादन यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले.

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते जिल्हयातील नगरपरिषदांमधून आलेली माती एका अमृत कलशामध्ये एकत्रित करण्यात आली. या कलशातील मातीचे जिल्हाधिकाऱ्यांनी पुजन केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) गोपीनाथ ठोंबरे, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी. व्ही. गोदेपुरे, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, भिवंडी महापालिका उपायुक्त सचिन माने, अंबरनाथचे नेहरु युवा केंद्राचे समन्वयक निशांत रौतेला, अंबरनाथ नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, अंबरनाथ अतिरिक्त मुख्याधिकारी अभिषेक पराडकर, कुळगांव-बदलापूर नगरपालिका मुख्याधिकारी योगेश गोडसे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, नवी मुंबई महापालिका क्रीडा अधिकारी अभिलाषा राहुल पाटील, उल्हासनगर महापालिका सचिव प्राजक्ता कुलकर्णी, श्रध्दा बाविस्कर यांच्यासह स्वंयसेवक उपस्थित होते.

‘माझी माती माझा देश' उपक्रम अंतर्गत ठाणे जिल्ह्यातून सहा महापालिकांचे प्रत्येकी एक याप्रमाणे ६, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा १, जिल्हा परिषदेच्या पाचही पंचायत समितीचे प्रत्येकी एक याप्रमाणे ५ अमृत कलश मुंबई येथील राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी येत्या २६ ऑक्टोबर २०२३ रोजी रवाना होणार आहेत. त्यानंतर सदर कलश २७ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या देशस्तरीय कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत. या कलशाबरोबर एक समन्वयक आणि २४ स्वयंसेवक ठाणे जिल्ह्यातून जाणार आहेत.

ठाणे जिल्ह्यातील माती आणि तांदूळ असलेला कलश दिल्ली येथील अमृत वाटिकेत जाणार आहे, ती जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्रातील माती एक वेगळीच असून या मातीला वीरांची परंपरा लाभली आहे. गेली ७५ वर्षे आपल्या देशात लोकशाहीची जपवणूक करत आहोत. ‘माझी माती माझा देश' या उपक्रमातून जगाला आपल्या समृध्द लोकशाहीचा आणि संदेश पोहोचविला जाणार आहे. यापुढील काळातही आपली लोकशाही जपणार आहोत. जिल्ह्यात सदर उपक्रम देशभक्ती आणि समर्पण भावनेतून यशस्वी करण्यात आला आहे, असे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले.

सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने उपजिल्हाधिकारी  ठोंबरे यांनी ‘माझी माती माझा देश' उपक्रमाची आणि जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी पंचप्रण शपथही घेण्यात आली.

चिमुकल्या बहिणींचे जिल्हाधिकाऱ्यांकडून विशेष कौतुक...
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सदर कार्यक्रमास कुळगांव-बदलापूर नगरपरिषदच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन करुन सुरुवात केली. यावेळी महेंद्र वानखेडे यांनी वीरश्रीयुक्त पोवाडा सादर केला. कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेच्या शाळेतील विद्यार्थिंनी किंजल महेश जाधव आणि क्रिशा महेश जाधव यांनी सुरेल आवाजात ‘ऐ वतन ऐ वतन' असे देशभक्तीपर गीत सादर केले. या चिमुकल्यांचे सदर गीत ऐकून जिल्हाधिकारी शिनगारे यांनी या दोघींचे कौतुक केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका अभियंता स्वप्निल देसाई यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध प्रसिध्द