कोकण रेल्वेची प्रवासी मालवाहतुकीसह सर्वच क्षेत्रात सर्वोच्च कामगीरी

कोकण रेल्वेचा 33 वा स्थापना दिवस  मोठया उत्साहात साजरा

नवी मुंबई : कोकणच्या विकासात मैलाचा दगड ठरलेल्या कोकण रेल्वेने आपला 33 वा स्थापना दिवस सोमवारी मोठया उत्साहात साजरा केला. यावेळी कोकण रेल्वेच्या गत 33 वर्षाच्या कामगीरीची माहिती देताना कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी कोकण रेल्वेने प्रवासी मालवाहतुकीसह सर्वच क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी केल्याचे सांगितले. याप्रसंगी कोकण रेल्वेचे संचालक राजेश भडंग (फायनान्स), संतोष कुमार झा (ऑपरेशन्स, कमर्शिअल), आर.के. हेगडे (वे-वर्कस्) व्यासपीठावर उपस्थित होते. 

यावेळी संजय गुप्ता यांनी माहिती देताना कोकण रेल्वेने आपल्या मार्गाचे 100 विद्युतीकरण पुर्ण केल्याचे सांगितले. शिवाय आतापर्यंतचा सर्वाधिक 963.43 कोटी रुपयांचा प्रवासी महसूल मिळवल्याचे तसेच 767.47 कोटी रुपयांचा सर्वाधिक मालवाहतूक महसूल प्राप्त केल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे 3274.70 कोटींचा सर्वाधिक प्रकल्प महसूल मिळण्याबरोबरच 5152.23 कोटी रुपयांचा एकूण महसूल कमावला आहे. कोकण रेल्वेला आतापर्यंतचा सर्वोच्च 278.93 कोटी रुपये इतका निव्वळ नफा झाल्याचे सांगतानाच कोकण रेल्वेने यावर्षी लोडिंगमध्ये देखील आतापर्यंतची सर्वाधिक मजल मारल्याचे तसेच या कामगीरीत कोकण रेल्वेच्या कर्मचाऱयांचा मोलाचा वाटा असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
 कोकण रेल्वे व्यवस्थापनाच्या 25 वर्षांच्या अखंडित परिचलन सेवापुर्तीनिमित्त महामंडळातील अधिकारी-कर्मचाऱयांचा कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी कोकण रेल्वेचे उप महाव्यवस्थापक (जनसंपर्क) गिरीश करंदीक, कार्यकारी संचालक (प्रकल्प) एल. प्रकाश, डेप्युटी लेखा अधिकारी अरुप बागूल यांच्यासह विविध विभागात उल्लेखनीय काम केलेल्या विभागांना तसेच वैयक्तिक कामगिरी केलेल्या अधिकारी-कर्मचारी यांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात कोकण रेल्वे जनसंपर्क विभागालादेखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर सोहळ्यास कोकण रेल्वेच्या सर्व विभागातील विभागप्रमुख, अधिकारी-कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रम