रस्त्यांची कामे १५ डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याची कालमर्यादा

प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणार - आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे  : ठाणे शहर खड्डेमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने दिलेल्या ६०५ कोटी रुपयांच्या निधीतून सुरु असलेली रस्त्यांची सर्व कामे कोणत्याही परिस्थितीत १५ डिसेंबर पर्यंत पूर्ण झालीच पाहिजेत. रस्त्यांची जी कामे प्रलंबित राहतील त्याबद्दल जबाबदारी निश्चित केली जाईल, असे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रात  ६०५ कोटी रुपयांच्या निधीतून एकूण २८२ रस्त्यांची कामे सुरु झाली आहेत. त्यात विविध ठिकाणी युटीडब्ल्युटी, सिमेंट काँक्रिटीकरण, मास्टिक पध्दतीने रस्त्यांची कामे केली जात आहेत. नागरिकांना चांगल्या प्रकारचे आणि खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करुन देण्यासाठी सुरु असलेली सदर कामे ८० ते ९० टक्के पूर्ण झाली आहेत. पावसाळ्याच्या मोसमात जुलै महिन्यापासून सदर कामे थांबविण्यात आली होती. आता ती कामे पुन्हा सुरु झालेली आहेत. त्यापैकी जी कामे अपूर्ण आहेत ती महिन्याभरात आणि जी कामे नव्याने सुरु करायची आहेत, ती दोन महिन्यात पूर्ण करण्याचे बंधन सर्व कार्यकारी अभियंता यांच्यावर टाकण्यात आले आहे.

सर्व अपूर्ण आणि नवीन कामाची यादी करुन त्यांची कालमर्यादा आखून घ्यावी. त्यात प्रलंबित कामांसाठी, भूसंपादन करण्याचा विषय वगळता कोणताही अपवाद केला जाणार नाही. काही कामे शक्य नसतील तर त्याची सयुक्तिक कारणमिमांसा सादर करावी. तशा कामांबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त बांगर यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी निधी मंजूर करताना गुणवत्तापूर्ण कामे आणि कालमर्यादा याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे या प्रकल्पातील कामे सुरु आहेत, असे होता कामा नये. कमीत कमी कालावधीत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अभियंत्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आयुक्त बांगर यांनी सूचित केले.

सदर बैठकीत, महापालिका क्षेत्रातील शौचालय दुरुस्ती आणि बांधकाम, शाळा दुरुस्ती, रेल्वे स्थानक परिसर सौंदर्यीकरण, उड्डाणपुलाखालील क्रीडा सुविधा यांचाही आढावा आयुक्त बांगर यांनी घेतला. या बैठकीला महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपनगर अभियंता रामदास शिंदे, विकास ढोले, उपायुक्त उमाकांत गायकवाड, सर्व कार्यकारी अभियंता, आदि उपस्थित होते.
 
कार्यकारी अभियंता यांनी  पुढाकार घ्ोऊन कामांना गती द्यावी. जिथे काही अडचणी येतील त्यावर पर्याय शोधावा. तरीही मार्ग निघाला नाही तर वरिष्ठांशी बोलून मार्ग काढून घ्या. कोणत्याही स्थितीत १५ डिसेंबर नंतर कामे प्रलंबित राहू नयेत, एवढे मात्र नवकी. -अभिजीत बांगर, आयुवत-नवी मुंबई महापालिका.

रस्त्यांची नवीन कामे करताना दक्षता घ्या...
रस्त्यांची नवीन कामे सुरु करताना काही ठिकाणी वाहतूक वळवावी लागेल. अशा  ठिकाणी नागरिकांची कमीत कमी गैरसोय होईल, याची दक्षता अभियंत्यांनी घ्यावी. त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी सुरु किंवा पूर्ण करण्यात आलेल्या कामाच्या व्यतिरिक्त इतर काही रस्त्यांची पावसाळ्यात दुरुस्ती करावी लागली असेल तर अशा रस्त्यांची प्रभाग समितीनिहाय माहिती सादर करावी. त्यात रस्त्यांची नावे, लांबी, मालकी, दोष दायित्व कालावधी आदींची माहिती द्यावी. त्यातून त्या रस्त्यांचे पुढील पावसाळ्यापूर्वी नियोजन करणे शक्य होईल, असे आयुक्त बांगर यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 बाळकुम येथे आयुष्यमान भव अभियान संपन्न