एपीएमसी बाजारात कांदा दरात वाढ

‘दिवाळी'च्या तोंडावर आणखी उसळी घेण्याची शक्यता

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) कांदा-बटाटा बाजार आवारात मागील आठवड्यात कांदा दर काहीसे स्थिर असताना १६ ऑवटोबर रोजी आवक घटल्याने अचानक कांदा दराने ५ ते ७ रुपयांनी उसळी घेतली आहे. १६ ऑवटोबर रोजी कांदा २७ ते ३२ रुपये प्रतिकिलो दराने विकला गेला असून, कांदा दरवाढ आणखी सुरुच राहणार असल्यामुळे येत्या दिवाळी सणाच्या तोंडावर कांदा दरात मोठी वाढ होण्याची शक्यता कांदा-बटाटा व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

 मागील काही दिवसांपूर्वी कांदा निर्यातीवरून विविध बाजार समित्यानी बंद पुकारल्याने कांदा विक्री ठप्प झाली होती. मात्र, बाजार समित्या सुरु झाल्यानंतर आवक जरी सुरळीत झाली असली तरी कांद्याचा दर्जा सुमार होत गेला. परिणामी कांद्याला हवा तसा भाव मिळाला नाही. तर आता एपीएमसी बाजारात नवीन कांद्याची आवक घटली असून, आवक होणाऱ्या कांद्याचा दर्जा देखील फारसा चांगला नाही. त्यामुळे बाजारात सध्या उच्च प्रतीच्या कांद्याला मागणी अधिक आहे. मात्र, मागणी अधिक असून, देखील कांदा आवक घटली आहे.

वाशी मधील एपीएमसी बाजारात दररोज सरासरी ११० ते १४० गाड्या कांदा आवक होत असते. मात्र, १६ ऑवटोबर रोजी एपीएमसी बाजारात अवघ्या ७६ गाड्या कांदा आवक झाली. त्यामुळे मागणी नुसार आवक घटल्याने कांदा दराने पाच ते सात रुपयांनी उसळी घेतली.

दरम्यान, राज्यात कांदा उत्पादन कमी होत असल्याने एपीएमसी बाजारात कांदा आवक कमी होत आहे. एपीएमसी बाजारात कांदा आवक मागणीच्या तुलनेत कमी राहिली तरी आगामी दिवाळी सणाच्या दिवसांत कांद्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती कांदा-बटाटा व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई शहरातील हवा प्रदूषणात वाढ