सावधान! दिघाटी केळवणे मध्ये बिबट्याचा वावर
बिबट्या नेमका आला कुठून? रहिवाशांना पडला प्रश्न
उरण : पुन्हा एकदा उरण तालुवयात, दिघाटी केळवणे गावामध्ये बिबट्याचे दर्शन झाल्याने बिबट्या नेमका आला कुठून? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, दहा वर्षांपूर्वी करंजा गांव परिसरात शिरलेल्या बिबट्याने दहशत निर्माण केली होती.
उरण तालुक्यातील करंजा बंदर परिसरातील गावांमध्ये शिरलेल्या बिबट्याने दहशत निर्माण केली होती. त्यानंतर गव्हाण फाटा कंटेनर यार्ड आणि वेश्वी, चिर्ले जंगलात बिबट्या वावरताना दिसला होता. मागील महिन्यात कर्नाळा पक्षी अभयारण्य परिसरातील दिघाटी, चिरनेर गांव परिसरातील जंगलात बिबट्याचा मुक्त संचार जाणवत होता. त्यासंदर्भात वन अधिकारी वर्गाने जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पुढाकार घेतला नाही.
परिणामी, सदर बिबट्या हा केळवणे गावातील नागरी वस्तीत संचार करीत असल्याचे नुकतेच रहिवाशांच्या निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिकारीच्या शोधात असलेला बिबट्या आला कुठून? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. बिबट्या समोर आला तर घाबरुन न जाता दोन्ही हात उंच करुन जोरजोरात ओरडत इतर नागरिकांना मदतीला बोलवावे, असे आवाहन प्राणी, पक्षी, सर्प मित्र विवेक केणी यांनी केले आहे.