उरण तालुक्यात नवरात्रौत्सवाची लगबग
नवरात्रौत्सवात उरण तालुक्यात दुर्गामातांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
उरण : शारदीय नवरात्रौत्सव, दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे. नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समुह असा शब्दशः अर्थ होत असून सदर सण नऊ रात्री (आणि दहा दिवस) साजरा होतो. चैत्र महिन्यात आणि पुन्हा शारदा अश्विन महिन्यात साजरा होतो. शारदीय नवरात्रात अश्विन शुध्द प्रतिपदा ते अश्विन शुध्द नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. दुर्गोत्सव वर्षातून शरद ऋतू आणि वसंत ऋतुतही साजरा करण्याची प्रथा आहे. उरण तालुक्यात देखिल शारदिय नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पुरातन देवीच्या मंदिरात आणि सार्वजनिक नवरात्र उस्तव मंडळातर्फे देवीची मूर्ती आणून सदर उत्सव साजरा केला जातो.
उरण तालुक्यात पुरातन काळातील करंजा येथील श्री द्रोणागिरी माता मंदिर, उरण शहरातील श्री शितळादेवी, श्री उरणावती देवी, जरी मरी आई, मोरा गावातील श्री एकविरा देवी, जसखार गावची श्री रत्नेश्वरी देवी, नागांव तपोभूमीची मांगिणदेवी, फुंडे गावची घुरबा माता, डोंगरी ग्रामस्थांची अंबादेवी, शेवागावची ग्रामदेवता शांतेश्वरी माता, कळंबुसरे गावची श्री एकविरा देवी, चिरनेरची गांवदेवी या ठिकाणी या शारदिय नवरात्रौत्सवात दुर्गामातांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते. करंजा येथील द्रोणागिरी मातेचे मंदिर ३५० वर्षांपूर्वीचे आहे. तर मोरा गावाजवळचे श्री एकविरा मंदिर पांडवकालीन असल्याचे बोलले जाते.
नवरात्रीमध्ये देवीच्या दर्शनाला आतूर असणारे भक्त देवींची अनेक मंदिरे गाठतात. सर्वत्र देवी एकच असली तरी साडेतीन शक्तीपिठात विभागली गेलेली तिची सर्व रुपे पाहण्यासाठी भक्तांची धडपड सुरु असते. या शिवाय प्रत्येक गावात या कालावधीमध्ये देवीची मुर्ती आणून तिची पुजा-अर्चा केली जाते. नऊ दिवस येथे घट बसविले जातात. गरबा, दांडिया सारखे नृत्यांचे आयोजन केले जाते. नवरात्रौत्सव म्हणजे आनंदाचा, नाच-गाण्याचा, पावित्र्याचा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्त्रीयांच्या सन्मानाचा सण म्हणून साजरा केला जातो. उरण तालुक्यात जवळ जवळ ६० ठिकाणी सार्वजनिक नवरात्रौत्सव साजरा केला जातो. देवींच्या पुरातन मंदिरात घटस्थापना करुन तर एका ठिकाणी देवीचा फोटो ठेवून नवरात्रौत्सव साजरा केला जातो.
‘शिवसेना'चे तालुकाप्रमुख संतोष ठाकूर दरवर्षी साडेतीन शक्तिपीठांपैकी एका देवीची मुर्ती कलाकृतीच्या माध्यमातून ‘सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ राजणपाडा-चिंचपाडा'च्या वतीने साकारण्याचे काम करत आहेत. यावर्षी या मंडळाने तुळजाभवानी मातेची मूर्ती नवरात्रोत्सवात साकारण्याचे काम हाती घेतले आहे.