महापालिका तर्फे स्वच्छताकर्मींच्या कामाचा कृतज्ञतापूर्वक सन्मान

नवी मुंबई महापालिकेचे नेहमीच कामगार सुरक्षेला प्राधान्य -डॉ. राजळे

नवी मुंबई :  ‘स्वच्छता ही सेवा' उपक्रमांतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये दररोज सर्म्पित भावनेने करीत असलेल्या स्वच्छताकर्मींच्या कामाचा कृतज्ञतापूर्वक सन्मान व्हावा या उद्देशातून २७५ सफाईमित्रांचा मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात विशेष समारंभात सन्मान करण्यात आला.

सफाईमित्र सुरक्षा शिबीराच्या समारोपप्रसंगी आठही विभागातील मलनिःस्सारण वाहिन्यांची यांत्रिकी सफाई करणाऱ्या तसेच महापालिकेच्या अत्याधुनिक मलप्रक्रिया केंद्रांवर काम करण्याऱ्या २७५ सफाईमित्रांना अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या शुभहस्ते, शहर अभियंता संजय देसाई तसेच ‘घनकचरा व्यवस्थापन विभाग'चे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, उपअभियंता वसंत पडघन, अभियंता स्वप्निल देसाई, वैभव देशमुख, दिलीप बेनके यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी ‘घनकचरा व्यवस्थापन विभाग'चे उपायुक्त तथा ‘स्वच्छ भारत मिशन'चे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांनी स्वच्छतामित्र आणि सफाईमित्र यांच्या सेवाभावी कामगिरीमुळेच नवी मुंबई महापालिका स्वच्छतेमध्ये नेहमी अग्रेसर असते, असे सांगितले. अशा स्वच्छताकर्मींच्या कामाचा यथोचित गौरव व्हावा अशी महापालिका आयुक्त  राजेश नार्वेकर यांची मनोभूमिका असून त्यामुळेच सर्व राष्ट्रीय कार्यक्रमाप्रसंगी आयोजित समारंभात आपल्या स्वच्छताकर्मींचा सन्मान होण्यासाठी आयुक्तांचा आग्रह असतो. त्या अनुषंगाने सफाईमित्र सुरक्षा शिबीरांतर्गत ‘सन्मान सफाईमित्रांचा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे डॉ. राजळे यांनी सांगितले. नवी मुंबई महापालिकेने नेहमीच कामगार सुरक्षेला प्राधान्य देत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते बेलापूर विभागातील ३९, नेरुळ विभागातील २६, वाशी ३९, तुर्भे मधीील ३९, कोपरखैरणे विभागातील २२, घणसोली मधील २१ आणि ऐरोली-दिघा विभागातील ८ अशा एकूण १९४ मलनिःस्सारण वाहिन्यांची यांत्रिकी पध्दतीने स्वच्छता करणाऱ्या सफाईमित्रांना तसेच मलप्रक्रिया केंद्रावर कार्यरत सफाईमित्रांपैकी सेक्टर-५० नेरूळ येथील १०, सेक्टर-१२ बेलापूर येथील ११, सेक्टर-२० सानपाडा येथील ८, सेक्टर-१८ तुर्भे वाशी येथील ९, सेक्टर- १४ कोपरखैरणे येथील ११, घणसोली येथील ६, सेक्टर-१४ ऐरोली येथील ११ आणि इतर अशाप्रकारे एकूण २७५ सफाईमित्रांना फोटोफ्रेम स्वरुपातील प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे कँम्प फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून हेल्मेट, रिपलेक्टिंग जॅकेट, ग्लोव्हज, गॉगल, शूज अशा सुरक्षा साहित्यासह सुसज्ज बॅग तसेच पीपीई किट प्रदान करण्यात आले.


यापुढील काळात सफाईमित्रांसाठी प्रशिक्षिण शिबीरे आयोजित केली जाणार असून त्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती करुन दिली जाणार आहे. प्रत्येक सफाईमित्रास व्यक्तिगतरित्या सन्मानित करण्यात आल्यामुळे त्यांच्या नजरेत समाधान आणि उत्साह होता. मिळालेला सन्मान अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देत राहील, अशी भावना सफाईमित्रांकडून व्यक्त करण्यात आली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आई गोवर्धनी माता मंदिरात नवरात्रौत्सव जल्लोषात साजरा होणार