पामबीच मार्गावरील डिजिटल वेग मर्यादा फलक बंद
वाहनचालकांना कमाल वेगाचा विसर
वाशी : नवी मुंबई शहराचा ‘क्विन नेकलेस' अशी ओळख असलेला वाशी ते बेलापूर दरम्यानचा ‘पामबीच मार्ग' सर्वाधिक अपघातांसाठी देखील प्रसिध्द आहे. त्यामुळे पामबीच मार्गावरील वाढत्या वाहन अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी नवी मुंबई महापालिका मार्फत अनेक उपाययोजना राबवत डिजिटल वेग मर्यादा फलक देखील लावण्यात आले होते. मात्र, अल्पावधीतच पामबीच मार्गावरील डिजिटल वेग मर्यादा फलक बंद पडले आहेत.
भरधाव वेगासाठी प्रसिध्द असलेल्या पामबीच मार्गावर सातत्याने अपघात घडत असतात. त्यामुळे नवी मुंबई महापालिका द्वारे यापूर्वी पामबीच मार्गावरील सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने आय. आय. टी. मार्फत पाहणी करण्यात आली आहे. या अहवालात सूचविल्यानुसार पामबीच मार्गावरील ब्लॅकस्पॉटवर ॲटोमॅटिक हायस्पीड डिटेक्शन असणारे अत्याधुनिक कॅमेरे, सीसीटीव्ही, रंबलर आदी उपाययोजना महापालिका तर्फे करण्यात आलेल्या आहेत. तसेच पामबीच मार्गावर झालेल्या अपघातांच्या विविध कारणांचा विचार करताना चालकाचे वेगावर नियंत्रण सुटण्याची बाब प्रामुख्याने स्पष्ट होत आहे. त्यामुळे पामबीच मार्गावर ताशी ६० किलोमीटर वेगाने वाहने हाकावी, याकरिता महापालिका मार्फत वेग मर्यादा दर्शवणारे डिजिटल फलक पामबीच मार्गावर लावण्यात आले होते. मात्र, अल्पावधीतच डिजिटल वेग मर्यादा फलक बंद पडले असल्याने पामबीच मार्गावरुन वाहने सुसाट जात आहेत. त्यामुळे बंद पडलेल्या पामबीच मार्गावरील डिजिटल वेग मर्यादा फलकांची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी आता या मार्गावरुन जाणाऱ्या वाहन चालकांकडून केली जात आहे.
पामबीच मार्गावर कमाल वेग मर्यादा दर्शवण्यासाठी लावण्यात आलेले डिजिटल फलक जर बंद असतील तर ते तात्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना संबधीत अभियंत्यांना देण्यात येतील. - सुनील लाड, कार्यकारी अभियंता (विद्युत) - परिमंडळ-१, नवी मुंबई महापालिका.