दिवा पूर्व -पश्चिम भागाला जोडणारा उड्डाणपुल लवकरच खुला          

भूसंपादन आणि जोड रस्ते कामाला गती देण्याचे निर्देश  

ठाणे : दिवा रेल्वे स्थानकाजवळील दिवा पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचे काम वेगाने करण्यात येणार आहे. त्यामुळे दिवा पूर्व -पश्चिम भागाला जोडणारा उड्डाणपुल लवकरच जनतेसाठी खुला केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक भूसंपादन आणि जोड रस्ते यांच्या कामाला गती देण्याचे निर्देश, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.  

दिवा पूर्व आणि पश्चिम येथील उड्डाणपुलाचे काम आणि परिसरातील व्यवस्था यांची पाहणी १३ ऑवटोबर रोजी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली. या पाहणी दौऱ्याच्या वेळी आमदार प्रमोद पाटील, माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्यासह महापालिका नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उप नगर अभियंता रामदास शिंदे, विकास ढोले, कार्यकारी अभियंता धनंजय मोदे, दीपक माने आदी अधिकारी उपस्थित होते.

उड्डाणपुलाचे जोड रस्ते आणि गटार यांचे काम पूर्ण झाल्यावर भिंतीचे काम करता येणार आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यात सदर काम पूर्ण करावे. पूलाच्या दोन्ही बाजूंच्या भागात भूसंपादन पूर्ण झालेल्या रस्त्याची कामे येत्या १५ जानेवारी पर्यंत पूर्ण करण्यात यावीत. वेगाने काम करताना तडजोड न करता गुणवत्ता राखावी. तसेच, दिवसा वाहन आणि नागरिकांची वर्दळ लक्षात घेता रात्रीच्या वेळी जास्तीत जास्त काम करण्यावर भर द्यावा, असे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.

दिवा पश्चिम येथील महापालिका शाळा परिसर, गावदेवी मंदिर या पट्ट्यात उड्डाणपूलाची मार्गिका उतरणार आहे. त्या मार्गिकेच्या संपूर्ण भागाची पाहणी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली.

रेल्वेचेही उड्डाणपुलासाठी समांतर काम सुरु आहे. त्यांच्या कामाशी समन्वय साधून पूर्व बाजूचे गर्डर लॉन्चिंग आणि डेक स्लॅब आदी कामे ३० जूनपर्यंत पूर्ण होण्यासाठी नियोजन करावे, असे निर्देश यावेळी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.        

भूसंपादनाचा शिल्लक विषय मार्गी लावण्यासाठी स्थानिक नागरिक, शहर विकास विभाग यांच्यासह येत्या १५ दिवसांत बैठक आयोजित करण्यात येणार असून, त्या बैठकीत तोडगा काढून उड्डाणपुलाचे काम अधिकाधिक जलद कसे पूर्ण करता येईल ते पाहण्यात येईल, असे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कार्ला गडावरील श्री एकविरा देवी मंदिरात आज घटस्थापना