एपीएमसी फळ बाजार समोर पुन्हा फेरीवाल्यांचे बस्तान
रस्त्यावरुन चालत जाणाऱ्या पादचाऱ्यांना नाहक त्रास
वाशी : मागील आठवड्यात वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजार समोर दोन फेरीवाला महिलांनी नवी मुंबई महापालिकेच्या महिला सुरक्षा रक्षकाला मारहाण केली होती. याबाबत ‘एपीएमसी पोलीस ठाणे' मध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र, सदर घटनेला ८ दिवस होत नाही तोवर एपीएमसी फळ बाजार समोर फेरीवाल्यांनी पुन्हा आपले बस्तान बसवण्यास सुरुवात केली आहे.
एपीएमसी बाजारात खरेदीसाठी रोज हजारो ग्राहक येत असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे ग्राहक भेटत असल्याने फेरीवाले वर्दळीच्या रस्त्यावर, पदपथावर बसून व्यवसाय करीत असतात. फेरीवाल्यांनी पदपथावर आणि रस्त्यावर त्यांचा व्यवसाय मांडल्याने एपीएमसी फळ बाजार समोरील रस्त्यावरुन चालत जाणाऱ्या पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एपीएमसी फळ बाजार येथून सानपाडा रेल्वे स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर असल्याने रोज हजारो नागरिक एपीएमसी मार्केट मध्ये ये-जा करत असतात. मात्र, बेकायदा फेरीवाल्यांनी एपीएमसी फळ बाजार समोरील रस्ता अडवून ठेवल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. शिवाय या ठिकाणी रोज वाहतूक कोंडी देखील होत असते.
मागील आठवड्यात एपीएमसी फळ बाजार समोरील बेकायदा फेरीवाल्यांवर महापालिका तर्फे कारवाई करण्यात आली. मात्र, त्यावेळी महिला फेरीवाल्यांनी महापालिकेच्या महिला सुरक्षा रक्षकांशी हुज्जत घालून त्यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. त्यावर संबंधित फेरीवाल्यांवर गुन्हा देखील दाखल झाला आहे. मात्र, एपीएमसी पोलीस ठाणे मध्ये अनधिवृÀत फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल होऊनही एपीएमसी फळ बाजार समोर ‘जैसे थे'च परिस्थिती असल्याचे चित्र दिसत आहे.
दिवसेंदिवस एपीएमसी फळ बाजार समोर बस्तान मांडणाऱ्या फेरीवाल्यांची दादागिरी वाढत असून, ग्राहक येणार नाही म्हणून पदपथावर उभे राहण्यासाठी देखील पादचाऱ्यांना मज्जाव केला जात असल्याचे प्रकार देखील येथे घडत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने एपीएमसी फळ बाजार समोर बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात सातत्य ठेवावे, अशी मागणी एपीएमसी मार्केटमध्ये येणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे.