‘एमजेपी'ची पाईपलाईन जीर्ण झाल्याने दुर्घटना?
नवीन पनवेल येथील पंचशीलनगर झोपडपट्टी परिसरात पाणीच पाणी
नवीन पनवेल : नवीन पनवेल येथील पंचशीलनगर झोपडपट्टीच्या पाठीमागील बाजुला असणारी ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरण'ची जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. येथील पाईप्लाईन फुटल्यामुळे झोपडपट्टी परिसरात पाणीच पाणी झाले होते.
‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरण'च्या पाईपलाईन शेजारीच पंचशीलनगर झोपडपट्टी वसलेली आहे. १९८६ सालच्या दरम्यान ‘जीवन प्राधिकरण'ची पाईपलाईन येथून गेलेली आहे. त्यातच अनेक ठिकाणी पाईपलाईन फोडून पाणी चोरुन नेले जात आहे. त्यामुळे ठिकठिकाणी नेहमीच पाणी वाया जातच असते. १२ ऑक्टोबर रोजी अचानक ‘जीवन प्राधिकरण'ची सदर पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आणि सगळीकडे पाणी साचले होते.
पाईपलाईन जवळपास दोन मीटर व्यास फुटली असल्याचे समोर आले आहे. पाईपलाईन जीर्ण झाली असल्याने सदर प्रकार घडला असावा, असे सांगितले जात आहे. त्यामुळे पाईपलाईन लवकरात लवकर दुरुस्त करावी अशी मागणी केली जात आहे.