आंतरराष्ट्रीय आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त नवी मुंबईत विविध उपक्रम

महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांची सामुहिक प्रतिज्ञा ग्रहण

नवी मुंबई : ‘संयुक्त राष्ट्र संघ'ने जाहीर केल्याप्रमाणे आपत्ती धोके कमी करण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती करण्याकरिता १३ ऑक्टोबरचा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिवस' म्हणून साजरा केला जातो.

या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार नवी मुंबई महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने १३ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय धोके निवारण दिनानिमित्त महापालिका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग'चे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, प्रशासन विभागाचे उपायुक्त शरद पवार, शहर अभियंता संजय देसाई, मुख्य लेखा-वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, उपायुक्त डॉ. श्रीराम पवार, डॉ. राहुल गेठे, दिलीप नेरकर, दत्तात्रय घनवट, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, विधी अधिकारी अभय जाधव, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, डॉ. रत्नप्रभा चव्हाण तसेच ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग'चे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत तायडे आणि इतर अधिकारी-कर्मचारी यांनी महापालिका मुख्यालयातील ॲम्पिथिएटर येथे आपत्ती धोके निवारणाची सामुहिक प्रतिज्ञा ग्रहण केली. यावेळी मुख्यालयात उपस्थित असणाऱ्या नागरिकांनीही या सामुहिक प्रतिज्ञा ग्रहण समारंभात उस्फुर्तपणे सहभाग घेतला.

आपत्ती धोके निवारणासाठी कटीबध्द राहण्याविषयीच्या शपथेमध्ये मी शासनाच्या आपत्ती सौम्यीकरणाच्या विविध उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून ‘आपत्तीपासून माझी, माझ्या परिवाराची, माझ्या समाजाची आणि सार्वजनिक मालमत्तेची सुरक्षा करण्याविषयी ज्ञान प्राप्त करीन, आपत्तीचे धोके कमी करणाऱ्या समुदाय आधारित उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेईल. माझ्या परिवारात आणि समाजात आपत्तीबद्दल जनजागृती करुन त्यासंबंधी पूर्वतयारी कशी करावी याविषयी सदैव प्रयत्न करीन. राज्यातील आपत्ती प्रवण भागात जीवित, वित्त-पर्यावरण विषयक हानी होऊ नये म्हणून मी सदैव कटीबध्द राहीन' अशा आशयाचा मजकूर असणारी प्रतिज्ञा सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सामुहिकरित्या ग्रहण केली.
कोणतीही आपत्ती सांगून येत नाही. त्यामुळे आपत्ती आल्यानंतर प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे जितके गरजेचे आहे, त्यापेक्षा अधिक आपत्ती उद्‌भवूच नये म्हणून खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मत यावेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी व्यक्त केले.

यावेळी अग्निशामक देविदास देशमुख यांनी नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती या दोन आपत्ती असल्याचे सांगत वैयक्तिक सुरक्षेसोबत सामाजिक सुरक्षा महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले. तसेच विविध आपत्तींची उदाहरणे देत त्यावेळी घाबरुन न जाता करायच्या तत्पर कृतींविषयी महत्वाची माहिती दिली.

सजग नागरिक म्हणून प्रत्येकाने काम केले तर मोठी दुर्घटना टळू शकते असे सांगतानाच महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अग्निशमन विषयक प्रात्यक्षिके सादर केली. विशेष म्हणजे अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले आणि विजयकुमार म्हसाळ यांनी स्वतः महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यासमवेत या प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला.

 नवी मुंबई महापालिकेचा मध्यवर्ती आपत्ती नियंत्रण कक्ष प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र म्हणून मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांकरिता मध्यवर्ती केंद्र म्हणून स्थापित असून २४ X ७ अहोरात्र कार्यान्वित आहे.

जागतिक आपत्ती धोके निवारण दिन निमित्त ‘नवी मुंबई महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग‘सिडको'ने या दिवसाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या मार्फत नागरिकांना आपत्ती प्रतिसादासाठी कटीबध्द होण्यासंदर्भात तयार करण्यात आलेली प्रतिज्ञा सामुहिकरित्या ग्रहण केली. तसेच विविध आपत्तींमध्ये घ्यावयाच्या खबरदारीविषयी जनजागृतीपर माहितीपटांचे प्रसारण करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रात्यक्षिकांद्वारे रंगीत तालीमही करण्यात आली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘एमजेपी'ची पाईपलाईन जीर्ण झाल्याने दुर्घटना?