प्रदूषण नियंत्रण मंडळ द्वारे वाशी सेक्टर-२६ परिसरात रात्री पाहणी

त्रयस्थ संस्थेकडून वायू प्रदूषण मोजणी करण्याची मागणी

वाशी : एमआयडीसी मधील रासायनिक कारखान्यांमधून रात्री-अपरात्री प्रदूषित वायू सोडले जातात. या विरोधात कारवाई करावी यासाठी वाशी सेक्टर-२६ मधील रहिवाशी सातत्याने आवाज उठवत आले असले तरी देखील येथील वायू प्रदूषण कमी होताना दिसत नाही. त्यामुळे वाशी सेक्टर-२६ मधील वायू प्रदूषणाचा अचूक शोध घेण्यासाठी ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ'चे नवी मुंबई उप प्रादेशिक अधिकारी जयंत कदम यांनी नवी मुंबई महापालिका आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांसमवेत ११ ऑवटोबर रोजी रात्री कोपरी परिसरात पाहणी केली.

मागील काही दिवसांपासून महापे ते वाशी दरम्यान रात्रीच्या वेळी वायू प्रदूषण होण्याचे प्रकार वाढले आहेत. एमआयडीसी मधील रासायनिक कारखानदारांकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम खुंटीला टांगून वारंवार वायू प्रदूषण केले जात आहे. या वायू प्रदूषणामुळे शहरी भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रासायनिक कारखान्यांतून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात रासायनिक वायू देखील हवेत सोडले जातात. प्रदूषित वायूच्या दर्प वासामुळे नागरिकांना मळमळ, श्वास घेण्यास त्रास होणे, अशा तक्रारी समोर येत आहेत. रासायनिक कारखानदारांकडून वारंवार सोडण्यात येत असलेल्या प्रदूषित वायूमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन नागरिक भयभीत होत आहेत. वायू प्रदूषण विरोधात कारवाई करावी म्हणून वाशी सेक्टर-२६, कोपरी गाव मधील रहिवाशांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सातत्याने आवाज उठवून, तव्रÀार करुन पाठपुरावा केला आहे. त्याची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने वाशी सेक्टर-२६ मध्ये वायू प्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी महिनाभर फिरते हवा गुणवत्ता चाचणी वाहन कार्यान्वित केले होते. तसेच महापालिकेकडून आठवडाभर रात्रीच्या वेळी धूळ शमन यंत्रणेने (एअर प्युरिफाय मोबाईल व्हॅन) फवारणी करुन प्रदूषित वातावरण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, परिस्थिती ‘जैसे थे' राहिल्याने अखेर ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ'चे नवी मुंबई उप प्रादेशिक अधिकारी जयंत कदम यांनी महापालिका आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांसमवेत ११ ऑवटोबर रोजी रात्री १२.४५ ते पहाटे २ पर्यंत कोपरी परिसरात पाहणी केली. या पाहणीत येथील हवेची दृष्यमानता तसेच तुर्भे लुब्रिझॉल कंपनी समोरील क्षेपणभुमीमधून वास येत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मात्र, सदर निष्कर्षावर येथील स्थानिक रहिवाशी समाधानी नसून, अधिकारी वर्गाकडून मुळ प्रदूषणकारी कारखानदारांना वाचवले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे त्रयस्थ संस्था मार्फत कोपरी गाव परिसरातील वायू प्रदूषण मोजण्याची मागणी आता स्थानिकांकडून जोर धरु लागली आहे.

पाहणी सदस्यांमध्ये ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ'चे नवी मुंबई उप प्रादेशिक अधिकारी जयंत कदम, ‘नवी मुंबई अधिष्ठान'चे अध्यक्ष संकेत डोके, सीईटीपी अधिकारी भरत चासकर, एमआयडीसी अभियंता प्रशांत चौधरी, ‘ठाणे-बेलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन'चे व्यवस्थापक अनिल चौगुले, नवी मुंबई महापालिका अभियंता अजिंक्य पाटील आणि प्रदूषण निरीक्षक राघवेद्र पास्ते यांचा समावेश होता.

वाशी सेक्टर-२६, कोपरी परिसरात होत असलेल्या वायू प्रदूषणामुळे येथील रहिवाशी रोज मृत्यूच्या दाढेत झोपत आहेत. याबाबत अनेक तक्रारी केल्या आहेत. मात्र, ज्या अधिकाऱ्यांनी पाहणी ठेवली होती त्या दिवशी वायू प्रदूषण कमी दाखवले गेले आहे. त्यामुळे स्थानिकांना पंचनाम्याबाबत संशय येत असून, आम्हाला त्रयस्थ संस्थेकडून वायू प्रदूषणाची पाहणी करण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी.- संकेत डोके, अध्यक्ष - नवी मुंबई अधिष्ठान. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आंतरराष्ट्रीय आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त नवी मुंबईत विविध उपक्रम