महापालिकेच्यावतीने गरोदर मातांची 14 ते 18 आठवड्यांमध्ये करण्यात येणारी एक सोनोग्राफी मोफत

संशयित क्षयरोग रूग्णांना देखील मोफत डिजीटल एक्स रे

पनवेल :  महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पनवेल , कंळबोली, खारघर व कामोठे, अशा चार प्रभागांमध्ये महापालिकेच्या एकुण 12 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. या ठिकाणी केंद्र व राज्य शासनांतर्गत विविध वैद्यकीय विषयक उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये माता व बाल संगोपन व जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम राबविला जात असुन, या कार्यक्रमांतर्गत महानगरपालिका हद्दीतील गरोदर मातांची 14 ते 18 आठवड्यांमध्ये करण्यात येणारी एक सोनोग्राफी  महापालिकेच्यावतीने मोफत करण्यात येत आहेत.

या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातुन पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील गरीब व गरजू व्यक्तींना प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिल्या जातात. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत प्रत्येक गरोदर मातांची 14 ते 18 आठवड्यांमध्ये करण्यात येणारी एक सोनोग्राफी करण्याकरिता खाजगी व शासकीय रेडिओलॉजिस्ट सेंटर यांचेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामध्ये. पनवेल, कंळबोली प्रभागात येणाऱ्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी  सिमीरा डायग्नॉस्टीक , खारघर प्रभागांतर्गत येणाऱ्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी वे टु केअर क्युअर डायग्नॉस्टीक,  कामोठे प्रभागांतर्गत येणाऱ्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी  क्रिटीकेअर लाईफलाईन रुग्णालय यांची निवड करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गरोदर मातांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन  मुख्य  वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी केले आहे.

 पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील संशयित क्षयरोग रुग्णांच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान व  राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत  डिजीटल एक्स-रे चाचण्या मोफत करण्यासाठी देखील स्वयंसेवी व खाजगी संस्थासोबत महापालिकेच्यावतीने सामंजस्य करार करण्यात आला आहे.

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत महापालिका कार्यक्षेत्रातील 12 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कक्षेमध्ये येणाऱ्या कार्यक्षेत्रात संशयित क्षयरोग रूग्ण मोहिम महापालिकेच्यावतीने सुरू आहे. या अंतर्गत संशयित क्षयरोग रूग्णांच्या तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये येणाऱ्या संशयित क्षयरोग रूग्णांच्या महापालिकेच्यावतीने मोफत डिजीटल एक्स-रे चाचण्या करण्यात येत आहेत. यासाठी  पॅसिफिक डायग्नॉस्टिक ॲण्ड मल्टिस्पेशालिटी डेंटल क्लिनिक, वे टु केअर क्युअर डायग्नॉस्टीक, क्रिटीकेअर लाईफलाईन रुग्णालय यांची निवड करण्यात आली आहे.

महापालिकेच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेल्या रूग्णांच्या संबधित लॅबमध्ये चाचण्या करण्यात येत आहे. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

 गरोदर मातांना प्रसुतीदरम्यान किंवा आवश्यकतेनूसार रक्तगटाचा रक्त पुरवठा देखील महापालिकेच्यावतीने मोफत करण्यात येत आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने साई रक्त केंद्र आणि रोटरी क्लब ब्लड बँक यांच्यांशी सामजस्य करार करण्यात आला  आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरण आगारात बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान संपन्न