सफाईमित्रांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

एनडीआरएफ मार्फत नवी मुंबईतील २५० सफाईमित्रांना प्रशिक्षण

नवी मुंबई : नवी मुंबई शहर स्वच्छतेमध्ये नावाजले जात असताना स्वच्छतेची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या स्वच्छताकर्मींकडेही महापालिकेच्या वतीने लक्ष दिले जात आहे. मलनिःस्सारण वाहिन्या आणि सेप्टिक टँक सफाई करणाऱ्या सफाईमित्रांना विशिष्ट पोशाख देण्यात आलेला असून त्यांना आपल्या कामाचा अभिमान वाटेल अशा वातावरण निर्मितीकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

या अनुषंगाने ‘स्वच्छता ही सेवा' अभियान अंतर्गत नवी मुंबई महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने, घनकचरा व्यवस्थापन आणि अभियांत्रिकी विभागाच्या सहयोगाने सफाईमित्र यांच्याकरिता एनडीआरएफ मार्फत आपत्ती विषयक प्राथमिक प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रात्यक्षिकासह घेण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरात २५० हुन अधिक सफाईमित्रांनी उत्साहाने सहभागी होत आपत्ती काळातील व्यवस्थापन बाबत बारकाईने माहिती जाणून घेतली.

महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्र येथे ‘एनडीआरएफ'च्या आरआरसी मुंबई येथील पाचव्या बटालियन मार्फत सदर प्रशिक्षण उपक्रम राबविण्यासाठी विशेष योगदान देण्यात आले. एनडीआरएफ निरीक्षक गौरव चौहान, सहा. निरीक्षक विजय म्हस्के आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिबिरात सहभागी २५० हुन अधिक सफाईमित्रांना आपत्ती विषयक मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षणात आपत्ती-आपत्तीचे प्रकार, तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्धता, प्राथमिक वैद्यकिय प्रतिसादक, सीपीआर, अग्निसुरक्षा आणि बचाव अशा विविध विषयांवर माहिती देण्यात आली. तसेच सफाईमित्रांकडून प्रात्यक्षिके करुन घेण्यात आली. या माध्यमातून सफाईमित्रांना सुरक्षा साधने आणि साहित्याची ओळख करुन देण्यात आली. तसेच प्रात्यक्षिकातून त्यांच्या वापराचे ज्ञानही त्यांना देण्यात आले.

याप्रसंगी शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन-आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील यांनी प्रशिक्षण शिबिरास उपस्थित राहून सफाईमित्रांचा उत्साह वाढविला. घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांचे अधिकारी, कर्मचारी यांनीही आयोजन कार्यात महत्वाची भूमिका बजावली.

सफाईमित्रांना आपत्ती व्यवस्थापन विषयक माहिती आणि प्रात्यक्षिक स्वरुपातील प्रशिक्षण एनडीआरएफ सारख्या मान्यताप्राप्त संस्थेमार्फत देऊन नवी मुंबई महापालिकच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने एक चांगला उपक्रम हाती घेतला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशी मध्ये नियमबाह्यरित्या डेब्रिज वाहतुक?