वाशी मध्ये नियमबाह्यरित्या डेब्रिज वाहतुक?

डेब्रिज वाहतुकदारांकडून नियमांना हरताळ

वाशी : नवी मुंबई शहरातील वाशी उपनगरात डेब्रिज वाहतुक करणाऱ्या वाहनांकडून नियमबाह्य पध्दतीने डेब्रिज वाहतुक केली जात आहे. मात्र, या नियमबाह्य डेब्रिज वाहतुकीकडे नवी मुंबई महापालिका डेब्रिज भरारी पथक आणि नवी मुंबई उप प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने डेब्रिज वाहतुक करणाऱ्या वाहनांकडून एखादा अपघात घडल्यास त्यास जबाबदार कोण?, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

 नवी मुंबई महापालिका क्षेत्रात जर डेब्रिज (राडारोडा) वाहतुक करायची असेल तर त्याबाबत हद्द, रस्ता वापरण्यासाठी डेब्रिज वाहतुक करणाऱ्या वाहनांच्या क्रमांकाची यादी देऊन परिमंडळ निहाय परवानगी घ्यावी लागते. त्या परवानगीची एक प्रत डेब्रिज वाहतुक करणाऱ्या वाहनाच्या काचेवर दिसेल अशा तऱ्हेने लावावी लागते. तसेच रस्त्यात डेब्रिज पडू नये म्हणून त्यावर आच्छादन टाकण्याची अट आहे. शहरांतर्गत भागात डेब्रिज वाहतुक करण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी ४ आणि रात्री ९ ते पहाटे ६ अशा निर्धारित वेळा आखून दिल्या आहेत. मात्र, डेब्रिज वाहतुक करण्यासाठी नियम असून देखील डेब्रिज वाहतुकदारांकडून नियम खुंटीला टांगून वाशी उपनगरात राजरोसपणे डेब्रिज वाहतुक सुरु आहे. वाशी मध्ये डेब्रिज वाहतुक करणाऱ्या वाहनांतून मोठ-मोठ्या दगडांची वाहतुक विना आच्छादन केली जाते. त्यामुळे डेब्रिज वाहतुक करणाऱ्या वाहनांतून दगडे खाली पडून अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी महापालिका उपायुवत (परिमंडळ-१) सोमनाथ पोटरे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद लाभला नाही.

वाशी मध्ये डेब्रिज वाहतुक करण्याची परवानगी देण्यात आलेल्या डेब्रिज वाहतुकदारांनी त्यांच्या वाहनाच्या दर्शनी भागात परवानगी प्रत लावणे तसेच डेब्रिज आच्छादित करणे क्रमप्राप्त आहे. डेब्रिज वाहतुक करणाऱ्या वाहनाच्या दर्शनी भागात परवानगी प्रत नसेल तसेच डेब्रिज आच्छादित नसेल तर सदर ठिकाणी पाहणी करुन योग्य ती कार्यवाही केली जाईल. - मोहन बनसोडे, निरीक्षक -डेब्रिज भरारी पथक, नवी मुंबई महापालिका.

अवजड वाहनांना नवी मुंबई शहरात वाहतुक करण्यासाठी शासनाने वेळा निर्धारीत केल्या आहेत. त्या वेळे व्यतिरिक्त जर अवजड वाहनांची वाहतुक सुरु असेल तसेच मर्यादेपेक्षा अधिक भार असेल तर त्या वाहनांवर आरटीओ अधिकारी कारवाई करतात. वाहतुक पोलीस फक्त वाहतुक नियंत्रण करतात. - सतीश कदम, वाहतुक पोलीस निरीक्षक - वाहतुक पोलीस शाखा, वाशी.

वाशी परिसरात जर नियमबाह्य पध्दतीने डेब्रिज वाहतुक सुरु असेल तर त्याबाबत आरटीओ भरारी पथकाकडून पाहणी करुन दोषी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. - हेमांगिनी पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी - वाशी, नवी मुंबई. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्य सुविधा, रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक