‘नवी मुंबई मेट्रो'ला उद्‌घाटनाची प्रतिक्षा

उद्‌घाटनाला १४ किंवा १५ ऑक्टोबरचा मुहूर्त?

नवी मुंबई : नवी मुंबईकरांचे ‘मेट्रो'चे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. येत्या नवरात्रोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बहुप्रतिक्षीत ‘नवी मुंबई मेट्रो'चे उद्‌घाटन करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्याअनुषंगाने उद्‌घाटनाची तयारी सुरु करण्यात आली असून ‘रायगड'चे जिल्हाधिकारी योगेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली खारघर मध्ये नुकतेच आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, ‘नवी मुंबई मेट्रो'चे उद्‌घाटन नवकी कधी असेल याची तारीख निश्चित्त नसून पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप त्याबाबत तारखेची घोषणा झाली नसल्याचे सुत्रांनी सांगितले.

रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या नवी मुंबई पोलीस, सिडको आणि संबंधित ‘स्थानिक स्वराज्य संस्थां'च्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये ‘नवी मुंबई मेट्रो'चे उद्‌घाटन १४ किंवा १५ ऑक्टोबर रोजी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. परंतु, खारघर मध्ये येऊन पंतप्रधान ‘नवी मुंबई मेट्रो'चे उद्‌घाटन करतील की ते ऑनलाईन प्रणालीद्वारे करतात? याबाबतही संदिग्धता आहे.

बेलापूर ते पेंधर अशा ११ कि.मी. लांबीचा ‘नवी मुंबई मेट्रो'चा पहिला टप्पा तयार आहे. या मार्गावरील ‘नवी मुंबई मेट्रो' प्रकल्पाचे काम दोन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. ‘नवी मुंबई मेट्रो' सुरु करण्याबाबत ऑक्टोबर २०२१ मध्ये सीएमआयईएस प्रमाणपत्र मिळालेले आहे. परंतु, अद्यापपर्यंत ‘नवी मुंबई मेट्रो' सेवा विविध कारणांमुळे सुरु होऊ शकलेली नाही. या दरम्यान सेंट्रल पार्क आणि बेलापूर मेट्रो स्थानकातील अपूर्ण काम देखील आता पूर्ण करण्यात आली आहेत. ‘नवी मुंबई मेट्रो' सेवा सुरु करण्यासाठी ‘रेल्वेे'च्या सुरक्षा आयुवतांनी २१ जून २०२३ रोजी ‘सिडको'ला ग्रीन सिग्नल दिलेला आहे. त्यामुळे ‘सिडको'तर्फे बेलापूर ते पेंधर पर्यंत मेट्रो सेवा सुरु करण्यात येणार आहे.

दरम्यान, ‘नवी मुंबई मेट्रो'चा एकुण प्रकल्प खर्च ३०६३ कोटी रुपये आहे. २०१९ मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ‘नवी मुंबई मेट्रो' प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवला होता. यानंतर ‘नवी मुंबई मेट्रो'चे काम जलदगतीने होण्यासाठी ‘नागपूर मेट्रो'चे काम पूर्ण केलेल्या ‘महा मेट्रो'कडे या प्रकल्पाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानंतर या प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले असल्याने आता सर्वांनाच ‘नवी मुंबई मेट्रो'च्या उद्‌घाटनाची प्रतिक्षा आहे

‘नवी मुंबई मेट्रो' प्रकल्पः 
बेलापूर ते पेंधर (तळोजा) पर्यंत ११ कि.मी. लांबीचा पहिला टप्पा आहे. या मार्गावर बेलापूर, सेक्टर-७ बेलापूर, सायन्स पार्क, उत्सव चौक, सेक्टर-११ खारघर, सेक्टर-१४ खारघर, सेंट्रल पार्क, पेठपाडा, सेक्टर-३४ खारघर, पंचनंद आणि पेंधर अशी स्टेशन आहेत. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘व्हेन चिल्ड्रन हॅव चिल्ड्रन टिपिंग पॉईंट टु ॲन्ड चिल्ड्रन मॅरेज' या पुस्तकाचे प्रकाशन