‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे'च्या उद्घाटनामुळे स्थानकावरील किरकोळ कामे जोरात
आरबीआय स्कायवॉक, पेठपाडा पेव्हर ब्लॉक काम सुरु
खारघर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे' सेवा सुरु करुन ‘सिडको'तर्फे नवी मुंबई मधील नागरिकांना दिवाळी भेट देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे' सुरु होण्यापूर्वी मेट्रो रेल्वे स्थानकाची किरकोळ कामे जोरात सुरु आहते. दरम्यान, ‘सिडको'ने सीबीडी वसाहत मधील प्रवाशांसाठी सीबीडी वसाहत मार्गावर स्कायवॉक उभारल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
‘सिडको'च्या अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे' मोठा प्रकल्प आहे. बेलापूर ते पेंधर या दरम्यानच्या ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे' मार्गावरील सर्व स्थानकांची सर्व कामे झाली असून, या मार्गाला ‘दिल्ली मेट्रो रेल्वे'द्वारे परवानगी मिळून सहा महिने झाले आहेत. ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे' मार्ग सिडकोकडून राज्य शासनाकडे पत्र व्यवहार सुरु होता. मात्र, त्यास शासनाकडून प्रतिसाद मिळत नव्हता.
दरम्यान, राज्यात ‘नमो महिला सशक्तिकरण' अभियान राबविण्यात येणार असून, या उपक्रम दरम्यान ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे'चा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्यामुळे बेलापूर ते पेंधर या मेट्रो रेल्वे मार्गातील आरबीआय, बेलपाडा आणि पेठपाडा आदी मेट्रो रेल्वे स्थानकावरील किरकोळ कामे जोरात सुरु आहेत.
दिल्ली मेट्रो रेल्वे अधिकाऱ्यांनी ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे'ची पाहणी करताना बेलपाडा स्थानकावर उतरुन खारघर रेल्वे स्थानक आणि आरबीआय मेट्रो रेल्वे स्थानकावरुन प्रवास करताना सीबीडी सेक्टर वसाहत मधील प्रवाशांची स्थानकाबाहेर पडताना वाहतुक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी स्कायवॉक उभारण्याची सूचना केली होती. सदर काम अंतिम टप्यात आहे. तर पेठपाडा मेट्रो रेल्वे स्थानक खाली रस्त्यावर पेव्हर ब्लॉक टाकून रस्ता तयार केला जात आहे. तसेच इतरही ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे' स्थानकांवरील किरकोळ कामे जोरात सुरु असल्याचे चित्र दिसत आहे.