अवैध इमारतीवरील ‘कोर्ट रिसिव्हर'चा फलक गायब
मुंबई उच्च न्यायालयाचा विकासकाद्वारे अवमान
वाशी : नवी मुंबई शहरातील वाढत्या अनधिकृत बांधकामांची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहुन सुमोटो याचिका दाखल करत घणसोली मधील अनधिकृत इमारत ‘कोर्ट रिसिव्हर'च्या ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या सदर आदेशानुसार घणसोली मधील अनधिकृत इमारतीवर ‘कोर्ट रिसिव्हर'चा फलक लावण्यात आला होता. मात्र, सदर फलक पूर्णपणे झाकण्यात आला आहे.
नवी मुंबई शहरातील घणसोली गावात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी एका व्यक्तीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी याचिकाकर्त्याला बाजूला काढून वाढत्या अनधिकृत बांधकामाची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने मागील महिन्यात स्वतःहुन सुमोटो याचिका दाखल करुन घेतली आहे. त्यानंतर घणसोली मधील सदर अनधिकृत इमारतीवर ‘कोर्ट रिसिव्हर' नेमून ती इमारत ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सदर इमारत ‘कोर्ट रिसिव्हर बॉम्बे उच्च न्यायालय' यांच्या ताब्यात असल्याचे फलक या इमारतीवर लावण्यात आला होता. मात्र, सदर फलक आता हिरव्या कापडाने पूर्णपणे झाकण्यात आला आहे. त्यामुळे सदर कृतीने मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान झाला असून, नवी मुंबई महापालिका आता सदर विकासकावर काय कारवाई करणार?, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
--