हिंवताप, डेंग्यू रोखण्यासाठी महापालिका सज्ज

आरोग्य विभागामार्फत विशेष मोहिमेद्वारे डास उत्पत्ती स्थानांचा शोध

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्राची भौगोलिक रचना, येथील विस्तृत खाडीकिनारा, रहिवाशी भाग आणि स्थलांतरित लोकसंख्या यामुळे महापालिका कार्यक्षेत्र हिंवताप, डेंग्यू या आजारांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. सदर बाब लक्षात घेत महापालिका आरोग्य विभागामार्फत शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे प्रत्यक्ष सर्वेक्षण, नियोजित साप्ताहिक वेळापत्रकानुसार डासअळीनाशक फवारणी आणि रासायनिक धुरीकरण, घरांतर्गत डास उत्पत्ती स्थाने शोधमोहीम याद्वारे नियमित स्वरुपात हिंवताप, डेंग्यू या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला जात आहे.

सद्यस्थितीत सातत्याने पाऊस न पडता त्याची ये-जा सुरु आहे. सदर वातावरण हिंवताप, डेंग्यू सारखे रोग पसरविणाऱ्या डासांसाठी अतिशय पोषक वातावरण आहे. त्यामुळे महापालिका कार्यक्षेत्रात डासांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. महापालिका कार्यक्षेत्रात वाढलेली डास उत्पत्ती रोखण्यासाठी आरोग्य विभागाने धडक मोहीम राबविण्यास सुरूवात केलेली आहे. हिंवताप, डेग्यू यासारखे रोग पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती मुख्यत्वे घरांतर्गत आणि घराभोवताली असलेल्या स्वच्छ साचलेल्या पाण्यामधील डासउत्पत्ती स्थानांमध्ये होत असते. त्या अनुषंगाने गतवर्षीच्या तुलनेत हिंवताप, डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ झालेली असल्याचे निदर्शनास येत असलेल्या संवेदनशील भागात तेथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून १५ ते २६ सप्टेंबर या कालावधीत घरांतर्गत डास उत्पत्ती स्थाने विशेष शोध मोहीम राबविण्यात आली.

सदर मोहिमेमध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील १३९ डासअळीनाशक फवारणी कामगारांना त्यांच्या कामाचे विभागनिहाय नियोजन करुन देण्यात आले होते. त्यांनी करावयाच्या प्रत्यक्ष कार्यवाहीचा कृती आराखडाही देण्यात आला होता. प्रत्येक कामगारास प्रतिदिन १५० ते २०० घरांची तपासणी करण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. या मोहिमेत त्यांनी संवेदनशील भागातील ७२,१८२ घरांना भेटी देऊन तेथील संभाव्य १,६६,९१ घरांतर्गत डास उत्पत्ती स्थानांची (वरची टाकी, खालची टाकी, लॅापट टँक, ड्रम, टायर्स कुंड्या, इत्यादि) तपासणी केली. त्यामध्ये ४०५ दुषित स्थाने आढळून आलेली असून, सदर दुषित डासउत्पत्ती स्थानांवर आवश्यक त्या ठिकाणी अळीनाशक फवारणी करण्यात आली. तसेच इतर डासोत्पत्ती स्थाने नागरिकांना आरोग्य शिक्षण देवून त्यांच्याकडून नष्ट करून घेण्यात आली. सदरची कार्यवाही मोहिमेनंतरही सुरुच आहे.

हिंवताप, डेंग्यू यासारख्या आजाराच्या नियंत्रणाकरिता महापालिकेसोबत तेथील नागरिक तसेच इतर सरकारी संस्था आणि खाजगी संस्थांचे सक्रिय सहकार्य मोलाचे आणि अपेक्षित असल्याने, सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी जागरुक राहून त्यांच्या घरात आणि घराभोवतालच्या परिसरात पाणी साचून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच हिंवताप, डेंग्यू आजाराचा रुग्ण किंवा इतर तापाचा रुग्ण आढळल्यास नजिकच्या महापालिका रुग्णालयात, नागरी आरोग्य केंद्रात तातडीने संपर्क साधावा. महापालिका मार्फत आपल्या घरी भेटी देणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. - राजेश नार्वेकर, आयवत-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अवैध इमारतीवरील ‘कोर्ट रिसिव्हर'चा फलक गायब