वाशी सेक्टर-२६ मध्ये ‘स्वच्छ हवा हा माझा अधिकार' मोहिमेला सुरुवात
दर रविवारी एक तास शांत बसत वायू प्रदूषणाविरोधात जनजागृती
वाशी : वाशी सेक्टर-२६ परिसरात होणाऱ्या सततच्या वायू प्रदूषणाने नागरिक बेजार झाले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र, वायू प्रदूषणावर काहीच कारवाई होत नसल्याने येथील रहिवाशांनी ‘स्वच्छ हवा हा माझा अधिकार' मोहीम राबवली असून, एक तास शांत बसत वायू प्रदूषणाविरोधात जनजागृती केली जाणार आहे.
‘स्वच्छ हवा' प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. मात्र, ठाणे-बेलापूर पट्टीतील एमआयडीसी मधील औद्योगिक कारखाने सतत वायू प्रदूषण करुन वाशी सेक्टर-२६ मधील रहिवाशांचा अधिकार हिरावून घत आहेत. याशिवाय वायू प्रदूषणाने येथील रहिवाशांच्या आरोग्याशी खेळ मांडला आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वारंवार तक्रार करुनही वायू प्रदूषण ‘जैसे थे' आहे. त्यामुळे वाशी सेक्टर-२६ मधील रहिवाशांनी जगायचे कसे?, असा सवाल करत शुध्द हवा मिळावी म्हणून ‘नवी मुंबई विकास अधिष्ठान'चे अध्यक्ष संकेत डोके यांनी ‘स्वच्छ हवा हा माझा अधिकार' या मोहिमेला ८ ऑक्टोबर पासुन सुरुवात केली आहे. वाशी सेक्टर-२६ येथील नागरीक चिंतामणी चौकात शांतीमय मार्गाने प्रशासनाला जाग येईपर्यंत प्रत्येक रविवारी ८ ऑक्टोबर पासून सायंकाळी ७ ते ८ वेळेत येथील रहिवासी बसणार आहेत. पहिल्याच दिवशी शेकडो नागरीकांनी या बैठकीला हजेरी लावली. यावेळी नागरीकांना परिसरांत होत असलेल्या वायु प्रदूषणाबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. नागरीकांनीही त्यांचा अनुभव यावेळी सांगितला. तसेच इतर सहभागी नागरीकांना मार्गदर्शन केले. जोपर्यंत वाशी सेवटर-२६ परिसरातील वायू प्रदूषण कमी होत नाही तोपर्यंत ‘स्वच्छ हवा हा माझा अधिकार' मोहीम सुरु राहणार आहे, असे संकेत डोके यांनी सांगितले.