विनावापर जलतरण तलावाची पुरती दुरवस्था

महापालिका तर्फे अतिरिक्त ६० लाख रुपये खर्च

वाशी : नवी मुंबई महापालिका द्वारे घणसोली सेक्टर-३ मधील सेंट्रल पार्क मध्ये बांधण्यात आलेला जलतरण तलाव सुरुवातीपासूनच वापर विना पडून होता. त्यामुळे सदर जलतरण तलावाची पुरती दुरवस्था झाली असून, जलतरण तलावाची सुधारणा करण्यासाठी महापालिका आता अतिरिक्त ६० लाख रुपये खर्च करणार आहे.

घणसोली सेक्टर-३ मध्ये नवी मुंबई महापालिका द्वारे ३९ हजार १३५ चौ. मी. क्षेत्रफळ जागेत १७ कोटी ५० लाख् रुपये खर्च करुन भव्य ‘सेंट्रल पार्क' उभारण्यात आले आहे. पंचमहाभुतांवर आधारित संकल्पनेनुसार सेंट्रल पार्क विकसित करण्यात आले आहे. या सेंट्रल पार्क मध्ये स्केंटिक रिंक, जलतरण तलाव, मिनी फुटबॉल टर्फ सुविधा निर्माण केलेले असून, या ठिकाणी क्रीडा विभागाकडून प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. २०१४ साली या ‘सेंट्रल पार्क'चे बांधकाम सुरु करण्यात आले. मात्र, मार्च-२०२० मध्ये महापालिका निवडणूक आचार संहितेत उद्‌घाटन रखडू नये म्हणून घाईघाईने तत्कालीन ‘नवी मुंबई'चे महापौर जयवंत सुतार यांनी ‘सेन्ट्रल पार्क'चे उद्‌घाटन उरकून घेतले. त्यानंतर आलेल्या ‘कोविड लाट'मुळे टाळेबंदी लागू झाल्याने नवी मुंबई शहरातील सर्व उद्याने आणि पार्क बंद ठेवण्यात आले होते. कोविड निर्बंध शिथिल होताच २२ ऑक्टोबर २०२१ रोजी सेंट्रल पार्क नागरीकांना खुले करण्यात आले. मात्र, ‘सेंट्रल पार्क' खुले होऊन देखील पार्क मधील जलतरण तलाव बंदच ठेवण्यात आला होता. या तलावाची खोली पाहता सदर तलाव बंद ठेवण्यात आला होता. मात्र, जलतरण तलाव बंद असल्याने त्याची फरशी खराब होऊन तलावाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सदर तलावाची सुधारणा करण्यात येणार असून, त्यासाठी महापालिका तर्फे ६० लाख रुपये अतिरिक्त खर्च करण्यात येणार आहेत.

सेंट्रल पार्क मधील जलतरण तलावातील लाद्या निखळल्ल्या आहेत. त्यामुळे  घणसोली सेक्टर-३ येथील सेंट्रल पार्क मधील जलतरण तलावाची तात्काळ दुरुस्ती करुन जलतरण तलाव नागरीकांसाठी वापरात आणावा, अशी मागणी आपण मे-२०२३ मध्ये नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे केली होती. - दिनेश म्हात्रे, नवी मुंबई शहर प्रमुख - आगरी सेना.
घणसोली सेक्टर-३ येथील सेंट्रल पार्क मधील जलतरण तलाव काही तांत्रिक कारणास्तव वापर विना पडून असल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सदर तलावाची आता सुधारणा करुन जलतरण तलावामध्ये अद्ययावत यंत्र सामुग्री बसवण्यात येणार आहे. - मदन वाकचौरे, कार्यकारी अभियंता - घणसोली विभाग कार्यालय - नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशी सेक्टर-२६ मध्ये ‘स्वच्छ हवा हा माझा अधिकार' मोहिमेला सुरुवात