कळंबुसरे ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार विरोधात कोकण आयुक्त कार्यालय समोर आंदोलन

१२ ऑक्टोबर २०२३  पासून सीबीडी मधील कोकण आयुक्त कार्यालय येथे कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन

उरण : उरण तालुक्यातील कळंबुसरे ग्रामपंचायत मध्ये ग्रामनिधी आणि लहान मुलांची दफनभूमी साफसफाई संदर्भात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबधित ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य नितीन पांडुरंग केणी, सविता मनोहर नाईक, अश्विनी नाईक, स्वप्नाली पाटील यांनी कोकण आयुक्त, रायगड जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी पंचायत समिती-उरण, मुख्य कार्य कारी अधिकारी-रायगड जिल्हा परिषद, नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे केली होती. पण, संबंधितांकडे पत्रव्यवहार करुन सुध्दा कळंबुसरे ग्रामपंचायती मधील श्रष्टाचाराला चाप बसत नसल्याने तसेच भ्रष्टाचार प्रकरणी सरपंच आणि ग्रामसेवकावर कोणतीही कायदेशीर कारवाई होत नसल्याने कळंबुसरे ग्रामपंचायतचे सदस्य नितीन पांडुरंग केणी, सविता मनोहर नाईक, अश्विनी तळीराम नाईक, स्वप्नाली महेश पाटील १२ ऑक्टोबर २०२३  पासून सीबीडी मधील कोकण आयुक्त कार्यालय येथे कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत.

जानेवारी ते जून २०२३ पर्यंत कळंबुसरे ग्रामपंचायती मधील ग्रामनिधीत २५  ते ३० लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे. आम्ही ग्रामपंचायत सदसस्यांनी विचारणा केली असता दुर्लक्ष केले जाते किंवा मासिक सभेला कुठल्याही विषयांवर गोंधळ करुन सदस्यांचे लक्ष विचलित करुन ठराव पास केले जातात आणि जमा खर्चाला मान्यता दिली जाते. तसेच काही कामांची खोटी माहिती पुरवली जाते. याबाबत १७ ऑगस्ट २०२३ रोजी संबंधित वरिष्ठ विभागाकडे तक्रारी अर्ज दाखल केला होता. परंतु, त्यांच्याकडून कोणतीच ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे न्याय हक्कांसाठी १२ ऑवटोबर रोजी कोकण आयुक्त यांच्या कार्यालयासमोर आम्ही बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत. आम्ही शांततेच्या आणि कायदेशीर मार्गाने लढा देत आहोत. आम्हाला न्याय मिळावा एवढीच आम्ही रास्त मागणी आहे. -नितीन केणी, ग्रामपंचायत सदस्य, कळंबुसरे.

कळंबुसरे ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार प्रकरणी १० ऑक्टोबर रोजी पूर्ण निकाल देण्यात येणार आहे. चौकशी, तपास पूर्ण झाला आहे. संबंधित व्यक्तींना कार्यालयात बोलविण्यात येईल. - समीर वठारकार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती-उरण. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विनावापर जलतरण तलावाची पुरती दुरवस्था