सी. पी. तलाव येथील कचऱ्याची दुर्गंधी तत्काळ थांबवा

वागळे इस्टेट येथील घनकचरा स्थलांतरण प्रकल्पाला आयुक्तांची भेट

ठाणे : वागळे इस्टेट मधील सी. पी. तलाव येथील घनकचरा स्थलांतर केंद्रातून आसपासच्या परिसरात जाणवणारी कचऱ्याची दुर्गंधी तत्काळ थांबली पाहिजे, असा सक्त इशारा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घनकचरा विभाग आणि कंत्राटदार यांना दिला आहे.

वागळे इस्टेट येथील घनकचरा स्थलांतरण प्रकल्पाला आयुक्त बांगर यांनी ६ ऑवटोबर रोजी भेट दिली. या प्रकल्पात ठाणे शहर आणि कळवा येथील कचरा एकत्र होतो. येथून तो प्राथमिक प्रकिया करुन क्षेपणभूमीवर पाठविला जातो. दररोज छोट्या आणि मोठ्या घंटागाड्यांच्या सुमारे ३०० फेऱ्यांद्वारे येथे कचरा आणतात. सदर ठिकाणी दररोज सुमारे ६०० टन कचऱ्याच्या हाताळणीचे चक्र २४ तास सुरु असते.

गेले काही दिवस कचरा स्थलांतरीत करण्यास अडचण आल्याने सी. पी. तलाव येथेच कचरा साठला होता. त्याचे आता स्थलांतरण करण्यात आले असले तरी या भागात कमालीची दुर्गंधी जाणवत होती. त्याबद्दल नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी वारंवार तक्रार केल्या. वाऱ्याच्या दिशेप्रमाणे दुर्गंधी परिसरात पसरते. त्यामुळे कचऱ्याच्या गाड्या येण्याच्या वेळेचे नेमके नियोजन करुन दररोज चार ते सहा तासांचा एक टप्पा केवळ या प्रकल्पाच्या स्वच्छतेसाठी मोकळा ठेवावा. या काळात उपलब्ध असलेल्या सर्व चांगल्या पध्दती वापरुन गाड्यांचा मार्ग, कचरा साठवणूक विभाग आणि आसपासचा परिसर स्वच्छ करण्यात यावा. सदर उपाय केल्याने हळूहळू दुर्गंधी कमी होऊन या परिसराला दिलासा मिळेल, असे आयुक्त बांगर यांनी यांनी सांगितले.

ताजा कचरा साठवून ठेवल्यानंतर दुर्गंधी सुटते. मात्र, ताज्या कचऱ्याची रोजच्या रोज विल्हेवाट लावली तर दुर्गंधी येणार नाही. तसेच त्यावर सतत फवारणी केली तरी दुर्गंधीचे प्रमाण कमी होईल, असेही आयुक्त बांगर म्हणाले.

सी. पी. तलाव येथील कचरा हाताळणी व्यवस्थेत कालबध्द आमुलाग्र बदल करण्यात येणार असल्याचे कंत्राटदाराने मान्य केलेले आहे. त्यामुळे तसा बदल घडून यायला पाहिजे. त्याचे दैनंदिन निरीक्षण करण्यात यावे. त्रुटी आढळल्यास लगेच त्याबद्दल नोटीस काढली जावी. तरीही परिस्थितीत दृश्य स्वरुपातील फरक पडला नाही तर कंत्राटदाराविरुध्द कडक कारवाई केली जाईल, असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.
 
कर्मचारी सुरक्षेला हवे प्राधान्य...
सदर भेटी दरम्यान प्रकल्पात काम करणारे तसेच घंटागाडीवर येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे सुरक्षेची पुरेशी साधने नसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्यावरुन त्यांनी कंत्राटदाराला समज दिली.

प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रकल्पात प्रवेश करताना एन ९५ मास्क दिला जावा. तो दररोज नवीन असावा. हातात ग्लोव्हज, पायात गमबुट हवेतच. कर्मचाऱ्यांना काम करताना सोयीचे होईल, अशी ही सुरक्षा साधने हवीत याबद्दल आयुक्त बांगर यांनी संबंधितांना बजावले. सदर कचऱ्याच्या सानिध्यात कोणीही कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय सलग आठ तास राहिले तर त्याच्या आरोग्यावर परिमाण होईलच. त्यामुळे कर्मचाऱ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे, असे आयुक्त बांगर म्हणाले.

कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय कर्मचारी काम करताना दिसला तर कंत्राटदाराला मोठ्या प्रमाणावर दंड करण्यात येईल. शहर स्वच्छता जेवढी महत्त्वाची आहे तेवढेच सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहणेही महत्त्वाचे आहे. त्यासाठी महापालिका आणि सर्व यंत्रणा यांनी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे, असेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.
 
पर्यायी रस्ता...
वागळे इस्टेट मुख्य रस्त्याला लागूनच नवीन रस्ता करुन तेथून घंटागाड्यांची ये-जा झाली तर अंतर्गत भागात होणारा चिखल आणि गाड्यांची गर्दी बंद होईल. या पर्यायी रस्त्याच्या आराखडा तत्काळ सादर करण्यास आयुक्त बांगर यांनी बांधकाम विभागास सांगितले. तसेच वागळे इस्टेट मधील पाच रस्त्यांपैकी एक असलेल्या सी. पी. तलाव लगतच्या रस्त्याचे काम मंजूर झालेले असल्याने ते लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. सदर रस्त्याच्या कामाचे त्रयस्थ संस्थेमार्फत ऑडिट केले जाईल, असेही आयुवत बांगर यांनी यावेळी सांगितले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भूमीपुत्रांचा आता ‘एमआयडीसी' विरोधात एल्गार