अतिक्रमित भूखंडावर कारवाई कधी?

वाशी सेक्टर-२६ मधील रहिवाशांचा ‘सिडको'ला प्रश्न
वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) परिसरातील मोकळ्या भूखंडावर वसलेल्या अनधिकृत झोपड्यांवर नवी मुंबई महापालिका आणि सिडको मार्फत कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे अतिक्रमित एपीएमसी परिसरातील भूखंडावर कारवाई कधी करणार?, असा प्रश्न वाशी सेक्टर-२६ मधील रहिवाशांनी ‘सिडको'चे अनधिकृत बांधकाम मुख्य नियंत्रक यांना निवेदन देऊन केला आहे.

वाशी सेक्टर-१९ मधील ‘सिडको'च्या मोकळ्या भूखंडावर अनधिकृत झोपड्यांचे साम्राज्य पसरले आहे. तसेच बेकादेशीर वाहनतळ, गॅरेज सुरु आहेत. मात्र, येथील अतिक्रमित वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणत अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. याशिवाय रात्री रस्त्यावर  देहविक्री, अंमली पदार्थ विक्री असे प्रकार सुरु असतात. तसेच येथील वाढत्या झोपड्यांमुळे कोपरी गाव, सेक्टर-२६ परिसरात चोऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. मात्र, त्याकडे पोलिसांनी डोळेझाक केल्याने कायदा-सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील रहिवासी आणि महिला वर्गात भीतीचे वातावरण आहे. या विरोधात सेक्टर-२६ मधील रहिवाशांनी महापालिका, सिडको तसेच मुख्यमंत्री दालनापर्यंत पाठपुरावा करुन कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रत्यक्षात फक्त कारवाईचा फार्स दाखवला जात असून, परिस्थिती ‘जैसे थे' आहे. त्यामुळे येथील बेकायदा झोपड्यांवर, वाहनतळावर कधी कारवाई करणार?, असा प्रश्न वाशी सेवटर-२६ मधील नागरिकांनी ‘सिडको'चे अनधिकृत बांधकाम मुख्य नियंत्रक यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

दरम्यान, येत्या १० ते १२ दिवसात वाशी सेवटर-२६ मधील बेकायदा झोपड्या, वाहनतळावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन ‘सिडको'चे अनधिकृत बांधकाम मुख्य नियंत्रक संजय जाधव यांनी वाशी सेवटर-२६ मधील रहिवाशांना दिले आहे.

एपीएमसी सेक्टर-१९ येथील मोकळ्या भूखंडावरील अतिक्रमणावर कारवाई करावी म्हणून आम्ही मागील एक वर्षापासून लढा देत प्रशासन सोबत पाठपुरावा करत आहोत. मात्र, प्रशासन कारवाईचा फार्स करत आहे. त्यामुळे या ठिकाणी ‘सिडको'ने ठोस कारवाई केली नाही तर वाशी सेक्टर-२६ मधील रहिवाशी स्वतः पोकलेन, जेसीबी घेऊन येथील अतिक्रमणावर कारवाई करतील. त्यानंतर निर्माण होणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेला सिडको जबाबदार राहील?. - संकेत डोके, अध्यक्ष - नवी मुंबई अधिष्ठान. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 सी. पी. तलाव येथील कचऱ्याची दुर्गंधी तत्काळ थांबवा