रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा!

रिक्षात सापडलेला ८० हजाराचा कॅमेरा केला परत

नवीन पनवेल : रिक्षा प्रवाशाचा विसरलेला ८० हजार रुपये किंमतीचा कॅमेरा, रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणामुळे पनवेल वाहतूक विभागाच्या पोलिसांनी संबंधित प्रवाशाला परत केला आहे.

पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाडिक, पोलीस हवालदार गावडे, पोलीस शिपाई वनवे असे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना प्रवासी दर्शन मनोहर घासे (रा. साईनगर, पनवेल) यांचा खिडुकपाडा ते पनवेल असा रिक्षाने प्रवास करीत असताना रिक्षामध्येच त्यांची बॅग राहिली असल्याचे पनवेल मध्ये उतरल्यानंतर लक्षात आले. या बॅगमध्ये कॅनन कंपनीचा ८० हजार रुपये किंमतीचा कॅमेरा, लेन्स तसेच महत्त्वाची कागदपत्रे होती. त्यामुळे घासे यांनी पनवेल एसटी स्टँड येथे पोलीस हवालदार गावडे, वनवे यांना भेटून सदरचा प्रकार सांगितला.

यानंतर गावडे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक मनोज महाडिक यांच्या निदर्शनास सदर प्रकार लक्षात आणून दिला. परंतु, सदर रिक्षाचा नंबर किंवा इतर कोणतीही माहिती नसताना तांत्रिक तपासाद्वारे सदर रिक्षा चालकाचा शोध घेतला. त्यानुसार रिक्षा नंबर एमएच-४६-बीडी-८८७० चालक अमित नवनाथ पवार (रा.कळंबोली) यांच्याशी संपर्क करुन त्यांच्या रिक्षात विसरलेल्या बॅगेबाबत विचारणा केली. यानंतर रिक्षा चालक अमित पवार यांनी त्यांच्या रिक्षात सापडलेली कॅमेरा, कागदपत्रांसह असलेली बॅग वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या ताब्यात दिली. याबद्दल पोलिसांनी रिक्षा चालक अमित पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अतिक्रमित भूखंडावर कारवाई कधी?