‘शिवशौर्य यात्रा'चे वाशीमध्ये जोरदार स्वागत

‘शिवशौर्य यात्रा'द्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, कार्य सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम

नवी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त तसेच ‘विश्व हिंदू परिषद'च्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त बजरंग दल कोकण प्रांताच्या वतीने काढण्यात आलेल्या ‘शिवशौर्य यात्रा'चे ६ ऑवटोबर रोजी नवी मुंबईमध्ये आगमन झाले. यावेळी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ‘शिवशौर्य यात्रा'चे जोरदार स्वागत करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि कार्य ‘शिवशौर्य यात्रा'च्या माध्यमातून सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जात आहे. तरुण पिढीला महाराजांच्या जाज्वल्य शौर्याच्या इतिहासातून प्रेरणा मिळणार आहे. ‘विश्व हिंदू परिषद'चे क्षेत्रीयमंत्री शेंडे यांनी अशा प्रकारच्या २५० यात्रा संपूर्ण देशामध्ये काढण्यात आल्या असल्याचे सांगितले.

याप्रसंगी आमदार गणेश नाईक, ‘भाजपा'चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी खासदार  संजीव नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्यासह बजरंग दलाचे पदाधिकारी, ‘विश्व हिंदू परिषद'चे कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिंधुदुर्ग ते मुंबई अशी ‘शिवशौर्य यात्रा' निघाली असून त्याचा समारोप दादर येथे होणार आहे. १५ ऑक्टोबर या दिवशी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात ‘शिवशौर्य यात्रा'चा समारोप होणार असून यावेळी होणाऱ्या सभेला ‘विश्व हिंदू परिषद'चे संयुक्त महामंत्री सुरेंद्र जैन संबोधित करणार आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 कौपिनेश्वर मंदिराची महापालिका आयुवत, जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी