‘माझा शेजारी सुध्दा माझी जबाबदारी' संकल्पना प्रत्येकाने अंमलात आणावी -पोलीस आयुक्त  

  नवी मुंबई पोलिसांचा स्तुत्य उपक्रम -अभिनेत्री पुजा हेगडे

नवी मुंबई : आपण ज्या पध्दतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी या संकल्पनेतून आपल्या कुटुंबाची काळजी घेतो, त्याच पध्दतीने प्रत्येकाने माझा शेजारी सुध्दा माझी जबाबदारी आहे, या संकल्पनेतून आपल्या शेजाऱ्यांची काळजी घेऊन ते सायबर गुन्ह्यांना बळी पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच त्याबाबत त्यांना जागरुक करावे, असे आवाहन ‘नवी मुंबई'चे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी विद्यार्थ्यांना केले.  

वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांसंदर्भात जागरुकता निर्माण करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या वतीने सायबर सुरक्षा जागरुकता अभियान राबविण्यात येत आहे. या ‘अभियान'ची सुरुवात ६ ऑवटोबर रोजी वाशीतून झाली. यावेळी सुप्रसिध्द सिने अभिनेत्री पुजा हेगडे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे, परिमंडळ-१चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, परिमंडळ-२ चे उपायुक्त पंकज डहाणे, मुख्यालय उपायुक्त संजयकुमार पाटील, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे, एसबीआय बँकेचे व्यवस्थापक चौधरी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.  

टेक्नॉलॉजी बाबत जागरुकता निर्माण करण्याबरोबरच, नवनवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून होणारे सायबर क्राईम आपण कसे टाळू शकतो. यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सायबर सुरक्षा जागरुकता अभियान राबविण्यात येत असल्याचे तसेच या ‘अभियान'ची सुरुवात या कार्यक्रमाने होत असल्याचे पोलीस आयुक्त भारंबे यांनी सांगितले.

‘सायबर जागरुकता अभियान'मध्ये प्रत्येक शाळा कॉलेज मधील विद्यार्थी, शिक्षक, पालकांच्या माध्यमातून समाजात सायबर जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे. सध्या जे काही वेगवेगळ्या प्रकारचे सायबर गुन्हे घडत आहेत तसेच उद्या घडणार आहेत, त्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे. जेणेकरुन आपण स्वतः आणि आपल्या आजुबाजुचे शेजारी या सायबर गुह्यांना बळी पडणार नाहीत, असे पोलीस आयुवत भारंबे म्हणाले.

नागरिकांनी सायबर गुन्ह्यांना बळी पडू नये यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वतः सायबर जागरुक होऊन आजुबाजुच्या सर्व लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या ‘सायबर सुरक्षा अभियान'मध्ये सायबर वॉरीयर (सायबर योध्दा) म्हणून सहभागी होण्याचे आवाहन यावेळी भारंबे यांनी केले. जे महाविद्यालयीन विद्यार्थी सायबर वॉरीयर म्हणून काम करण्यास इच्छुक असतील, त्या विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेबाबत पावर पॉँईटचे सादरीकरण, आपण स्वतः आपल्या परिसरात, समाजात याबाबत कशा पध्दतीने जागरुकता निर्माण करणार आहोत, याबाबतचे लिखीत साहित्य आणि नवनवीन कल्पना सादर करण्याचे आवाहन सुध्दा पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केले. नवी मुंबई पोलिसांच्या या अभियानात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचेही पोलीस आयुक्तांनी सांगितले.  

यावेळी अभिनेत्री पुजा हेगडे हिने देखील सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांनी सजग राहण्याचे तसेच कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडण्याचे तसेच आपली माहिती अथवा ओटीपी कुणालाही शेअर करु नये, असे आवाहन केले. तसेच नवी मुंबई पोलिसांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी नवी मुंबई पोलिसांकडून तयार करण्यात आलेल्या सायबर सुरक्षा संदर्भातील ३ शॉर्ट फिल्मचे अनावरण करण्यात आले. तसेच ‘सॅन्ड आर्ट'च्या आणि डान्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा संबंधी जागरुकता निर्माण करण्यात आली. सदर कार्यक्रमात नवी मुंबईतील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्यने सहभागी झाले होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जिल्हाधिकाऱ्यांची सीईओंसह प्राथमिक आरोग्य केंद्रांना मध्यरात्री भेट