महापालिका मुख्यालय येथे आठ विभागातील माती संकलित

नवी मुंबईत ‘अमृत कलश यात्रा'द्वारे माती संकलन

नवी मुंबई ः ‘माझी माती माझा देश' अर्थात ‘मेरी माटी मेरा देश' या राष्ट्रव्यापी उपक्रमांतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या आठही विभाग कार्यालय क्षेत्रातून संकलित केलेली माती ‘अमृत कलश यात्रा'द्वारे महापालिका मुख्यालयात वाजत-गाजत आणून मुख्यालय स्तरावरील अमृत कलशात मान्यवरांच्या शुभहस्ते एकत्रित करण्यात आली.

भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवित साजऱ्या झालेल्या या ‘अमृत कलश यात्रा'प्रसंगी आमदार रमेश पाटील, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, प्रशासन विभागाचे उपायुक्त शरद पवार, उपायुक्त तथा ‘माझी माती माझा देश उपक्रम'च्या नमुंमपा नोडल अधिकारी मंगला माळवे, क्रीडा-सांस्कृतिक विभागााच्या उपायुक्त ललिता बाबर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब  राजळे, उद्यान विभागाचे उपायुक्त दिलीप नेरकर, शिक्षण विभागाचे उपायुक्त दत्तात्रय घनवट, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, ‘नॅशनल सिक्युरिटी गार्ड'चे डेप्युटी कमान्डन्ट मेजर इंद्रजित बरेव आणि सुभेदार अजय प्रकाश, ‘वीर जवान फाऊंडेशन'चे अध्यक्ष माजी आर्मी ऑफिसर सुरेश काकडे, सचिव महेंद्र गवई आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी समारोपीय पर्वाचे औचित्य साधून संपूर्ण देशभरात राबविल्या जात असलेल्या ‘माझी माती माझा देश' अर्थात ‘मेरी माटी मेरा देश' या उपक्रमांतर्गत नवी मुंबई महापालिकेने आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साहाने कार्यक्रमांचे आयोजन करीत पहिल्या टप्प्यात ‘वसुधा वंदन, शिलाफलकम्‌, पंचप्रण शपथ, शहीद वीरांच्या कुटुंबियांचा सन्मान असे नानाविध उपक्रम भव्यतम स्वरुपात राबविले.

या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वांना मातृभूमीप्रेमाच्या एकाच धाग्याने जोडणारा ‘अमृत कलश यात्रा' असा अभिनव उपक्रम केंद्र सरकार मार्फत जाहीर करण्यात आला. सर्व विभाग कार्यालयांना देण्यात आलेल्या सुचनेप्रमाणे त्यांनी आपापल्या क्षेत्रात अमृत कलशाची उत्सवी स्वरुपात यात्रा काढून विभागांतील घरोघरी जाऊन या कलशांमध्ये घराघरांतील, विभागीय परिसरातील माती संकलित केली.

विभाग स्तरावरील माती संकलन केलेले अमृत कलश मुख्यालय स्तरावर आणताना आठही विभागातील मध्यवर्ती स्थळी नागरिकांनी पारंपारिक वेशभूषेत नटूनथटून यात्रेत सहभाग घेतला. विभागांमधील ‘अमृत कलश यात्रा' बँड तसेच पारंपारिक वाद्ये वाजवित परिसरामध्ये फिरविण्यात आली. पंचप्रण शपथ घेऊन सुरु झालेल्या या विभागीय यात्रांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. नवी मुंबई महापालिकेच्या आठही विभागांमधील माती संकलित केलेले अमृत कलश मुख्यालयाजवळ एकत्रितपपणे सजवलेल्या गाड्यांमधून आणण्यात आले. त्या ठिकाणी विभागांतील आठ अमृत कलशांची विद्यार्थी आणि नागरिकांची बँड पथके, विद्यार्थ्यांची लेझीम पथके याद्वारे मुख्यालय इमारतीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली.


अमृत कलशात संकलित माती दिल्लीतील शहीद स्मारकात वापरणार...
विभाग स्तरावरील कलशात संकलित केलेली तेथील घराघरातील माती महापालिका मुख्यालयात आठ अमृत कलशांतून आणून त्या ठिकाणी मुख्यालय स्तरावरील अमृत कलशात एकत्रित करण्यात आली. मुख्यालय स्तरावरील अमृत कलश राज्यस्तरावर मुंबई येथे पाठविला जाणार असून तेथून सदर अमृत कलश राजधानी दिल्ली येथे पाठविला जाणार आहे. नवी मुंबई प्रमाणेच देशभरातील लाखो गांवे-शहरांमधील संकलित माती दिल्ली येथे शहीदांच्या सन्मानार्थ बनविण्यात येणाऱ्या स्मारकामध्ये वापरली जाणार आहे.

शहीद वीरांच्या कुटुंबियांचा सन्मान...
देशाच्या संरक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या शहीद वीर जवानांच्या कुटुंबियांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ज्यामध्ये सन २००१ साली जम्मू-काश्मीर येथे संरक्षण कार्य करताना वीरमरण प्राप्त झालेले इंडियन आर्मी मधील नायक लक्ष्मण शेळके यांचे सुपुत्र अर्जुन शेळके, सन २००६ साली ऐरोली, सेवटर-७ येथील पंजाब ॲन्ड महाराष्ट्र बँकेवर पडलेल्या दरोड्यावेळी गुन्हेगारीविरोधी कार्यवाही करताना वीरमरण प्राप्त झालेले पोलीस हवालदार भिकू मारुती कराडे यांच्या पत्नी तसेच सन २००७ साली एमएसईबी पॉवरहाऊस-ऐरोली येथे दरोडेखोरांशी लढताना वीरमरण प्राप्त झालेले पोलीस नाईक गोपाळ सैंदाणे यांच्या पत्नी यांना सन्मानीत करण्यात आले. त्याचप्रमाणे इर्शाळवाडी दरड कोसळण्याच्या दुर्घटनेप्रसंगी मदतकार्य करताना वीरमरण प्राप्त झालेले नमुंमपा अग्निशमन विभागातील सहाय्यक केंद्र अधिकारी शिवराम ढुमणे यांच्या पत्नी कविता ढुमणे यांनाही सन्मानित करण्यात आले.

सांस्कृतिक कार्यक्रमातून देशभक्तीचे कलात्मक दर्शन...
यावेळी सादर झालेल्या देशभक्तीने भारलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा सुरेल प्रारंभ शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांनी गायलेल्या कविवर्य कुसुमाग्रज यांच्या ‘अनामविरा जिथे जाहला तुझा जीवनांत या कविता सादरीकरणाने झाला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय महापालिका शाळा क्र.५५ कातकरीपाडा रबाले यांचे समुहगान, शाळा क्र.३६ कोपरखैरणे गांव, शाळा क्र.१८ सानपाडा आणि शाळा क्र.९२ कुकशेत या तीन शाळांची देशभक्तीपर गीतांवरील समुहनृत्ये तसेच शाळा क्र.९८ गौतमनगर या शाळेचे काव्यनाट्य याद्वारे सांस्कृतिक कार्यक्रम देशभक्तीची भावना जागृत करीत उत्तरोत्तर रंगत गेला. उल्का झगडे या दिव्यांग विद्यार्थीनीचे गायन आणि भाषण उपस्थितांची कौतुकाची दाद मिळवून गेले. तर मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर श्रीहरी पवळे या रंगावलीकारांनी रेखाटलेली रांगोळी लक्षवेधी होती.

यावेळी केंद्र सरकारमार्फत ‘माझी माती माझा देश” उपक्रमाच्या अनुषंगाने बनविण्यात आलेल्या दोन व्हिडिओ चित्रफितींचेही प्रसारण करण्यात आले. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेने उपक्रमाच्या दोन्ही टप्प्यात विभागीय स्तरावर तसेच मुख्यालय स्तरावर आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांची व्हिडिओ चित्रफितही प्रदर्शित करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी अतिरिक्तआयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांच्या समवेत सामुहिकरित्या पंचप्रण शपथ ग्रहण केली.

‘माझी माती माझा देश' अर्थात ‘मेरी माटी मेरा देश' या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये नवी मुंबई महापालिका क्षेत्रामधील विभागाविभागात अमृत कलश यात्रा काढून घराघरांतून करण्यात आलेले माती संकलन आणि यासाठी नागरिकांनी दिलेला उत्स्फुर्त प्रतिसाद यामधून नवी मुंबईकरांचे मातृभूमीविषयीचे प्रेम आणि राष्ट्रीय एकात्मता यांचे दर्शन घडले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘माझा शेजारी सुध्दा माझी जबाबदारी' संकल्पना प्रत्येकाने अंमलात आणावी -पोलीस आयुक्त