महापालिका तर्फे तृतीय पंथीयांकरिता कोपरी मध्ये विशेष शौचालय

राज्यातील चौथा; नवी मुंबई शहरातील पहिला उपक्रम

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका द्वारे स्वच्छतेच्या अनुषंगाने नेहमीच अभिनव संकल्पना राबविणारे शहर म्हणून नवी मुंबई शहर ओळखले जाते. या पार्श्वभूमीवर एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून कोपरी गाव येथे नवी मुंबई महापालिका तर्फे तृतीयपंथीय नागरिकांसाठी स्वतंत्र विशेष शौचालय निर्मिती करण्यात आली असून, ‘स्वच्छता ही सेवा' या उपक्रमांतर्गत नुकतेच या विशेष शौचालयाचे लोकार्पण अनिता वाडेकर, मीरा पुजारी, कल्पना पुजारी, बर्लिन, अदा झा या तृतीय पंथीयांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. मुंबई, पुणे आणि नागपूर नंतर नवी मुंबई शहरात देखील तृतीय पंथीयांसाठी विशेष शौचालयाची निर्मिती करण्यात आली असून, नवी मुंबई शहरातील सदर पहिला उपक्रम आहे.

महापालिका मार्फत संपूर्ण नवी मुंबई शहरात ३१३ सार्वजनिक आणि २९७ सामुदायिक शौचालय उभारण्यात आलेली आहेत. सर्व शौचालयांच्या जागा गुगल मॅपवर दिसतात. त्यामुळे नागरिकांना आणि विशेषत्वाने नवी मुंबई शहरातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच पर्यटकांना प्रसाधन गृहांची सुविधा आपण आहोत त्या जागेपासून किती अंतरावर आहे, याची माहिती क्षणार्धात समजते आणि त्यांना सुविधाजनक होते.

तृतीयपंथीय नागरिक देखील समाजाचा एक महत्वाचा घटक असल्याचे नवी मुंबई महापालिका प्रशासनाने नेहमीच लक्षात घेतले असून, स्वच्छता कार्यात आणि विविध सामाजिक उपक्रमात तृतीय पंथीयांचा सहभाग करुन घेतलेला आहे. या कामात ‘लेट्‌स सेलिब्रेट फिटनेस' या संस्थेचा समवयक म्हणून फार मोठ्या प्रमाणावर उपयोग झालेला आहे.

महापालिका क्षेत्रात तुर्भे विभागातील कोपरी गाव भागामध्ये तृतीय पंथीयांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असून, या ठिकाणी तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र शौचालय असावे अशी मागणी केली जात होती. या अनुषंगाने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अभियांत्रिकी विभागास निर्देश दिल्यानंतर कोपरी विभागामध्ये तृतीय पंथांसाठी विशेष स्वतंत्र शौचालायची उभारणी करण्यात आली.

नैसर्गिक विधीकरिता तृतीय पंथीयांना पुरुषांसाठीच्या शौचालयाचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे तृतीयपंथीय नागरिक मोठ्या संख्येने एकत्र राहत असलेल्या ठिकाणी त्यांच्याकरिता स्वतंत्र शौचालय व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे. साधारणतः ९ लक्ष इतकी रक्कम खर्च करुन ८ बैठकी शौचालय उभारण्यात आले असून, त्याबद्दल तृतीयपंथीय नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

जगात स्त्री आणि पुरुष असे दोन माननीय घटक असले तरी तृतीय पंथीय तिसरा घटक देखील आपले जीवन व्यतीत करत असतो. भारतात तृतीय पंथियांना एका वेगळ्याच नजरेतून पाहिले जाते. त्यामुळे सामाजिक जीवनात त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा भागवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र, २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तृतीय पंथीयांना तृतीय लिंग म्हणून मान्यता दिली. त्यामुळे त्यांना इतर लोकांप्रमाणेच सर्व मूलभूत आणि सार्वजनिक सुविधा मिळण्याचा अधिकार मिळाला आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी आजही नैसर्गिक विधी करीता तृतीय पंथीयांना पुरुष शौचालयाचा आधार घ्यावा लागतो. पुरुष शौचालयात त्यांना छेडछाड सारख्या प्रकारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र शौचालयाची मागणी जोर धरु लागली होती. सदर मागणी लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिका तर्फे कोपरी गावात तृतीय पंथीयांसाठी विशेष शौचालयाची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी जवळपास ७० ते ७५ तृतीय पंथीय वास्तव्यास आहेत. महापालिकेने कोपरी गावात तृतीय पंथीयांसाठी विशेष शौचालयाची निर्मिती केल्याने संगीता पुजारी यांनी समाधान व्यक्त केले आहे.

समाजातील सर्व घटकांना समान न्याय देत आवश्यक सेवासुविधा पुरविण्यावर नवी मुंबई महापालिका भर देत असून, तृतीयपंथीयांची अडचण लक्षात घेऊन त्यांच्याकरिता स्वतंत्र विशेष शौचालय बांधण्याचे आणखी एक उल्लेखनीय पाऊल महापालिकेने उचललेले आहे. - राजेश नार्वेकर, आयुवत - नवी मुंबई महापालिका.

तृतीय पंथीयांची गरज लक्षात घेता नवी मुंबई महापालिका तर्फे तुर्भे विभाग अंतर्गत विशेष शौचालयाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच नवी मुंबई शहरातील तृतीय पंथीयांची वस्ती लक्षात घेऊन त्याठिकाणी देखील तृतीय पंथीयांसाठी विशेष शौचालय उभारण्याचा मानस आहे. - संजय पाटील, कार्यकारी अभियंता - तुर्भे विभाग, नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कारागृहावरील वाढत्या कैद्यांचा ताण होणार कमी