वायू प्रदूषणावर महापालिकेचा धूळ शमन यंत्राचा उतारा

रात्री धूळ शमन यंत्रणेने फवारणी

वाशी ः नवी मुंबई मधील वाशी परिसरात मागील महिना भरापासून वायू प्रदूषणात वाढ होत चालली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून वायू प्रदूषणाबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने धूळ शमन यंत्राचा उतारा शोधला आहे. कोपरखैरणे सेवटर-११, वाशी सेवटर-२६ आणि सेवटर-२८ परिसरात रात्री धूळ शमन यंत्रणेने (एअर प्युरिफाय मोबाईल व्हॅन) फवारणी करुन प्रदूषित वातावरण कमी करण्यात येणार आहे.

नवी मुंबई शहरात महापे, पावणे आणि तळोजा औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वसले आहे. शहरातील २५ टक्के भाग औद्योगिक क्षेत्राने व्यापला आहे. याशिवाय नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर नवीन बांधकामे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरु आहे. वाहनांमुळे  देखील हवा प्रदूषण होत असल्याचे निकष लावले जात आहेत. प्रदूषणामुळे नवी मुंबई शहराची हवा गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत आहे. मात्र, गेल्या महिनाभरापासून वाशी आणि कोपरखैरणे वेशीवर रात्री हवेत मोठ्या प्रमाणावर धुरके निदर्शनास येत असून, दर्प वास देखील येत आहे. त्यामुळे नित्याने वाशी आणि कोपरखैरणे मधील रहिवाशांकडून हवा प्रदूषणाची ओरड सुरु आहे. परिणामी वाशी आणि कोपरखैरणे या ठिकाणी प्रदूषित वातावरणावर नजर ठेवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ द्वारे फिरते हवा गुणवत्ता तपासणी वाहन तैनात करण्यात आले आहे. या वाहन तपासणी अहवालातुन हवेत प्रदूषित घटक आढळले असल्याची तोंडी माहिती देखील प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे. मात्र, प्रदूषित घटकांची आकडेवारी देण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी जयंत कदम यांच्याकडून टाळाटाळ केली जात आहे. दिवसेंदिवस वाशी आणि कोपरखैरणे येथील रहिवाशांच्या तक्रारी वाढत असल्याने येथील होणाऱ्या हवा प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता महापालिकेने धूळ शमन यंत्राचा पर्याय शोधला आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पोलीस चौकी होतायेत लुप्त