लोकल रेल्वे मेगाब्लॉकमुळे ‘एनएमएमटी' मालामाल

पनवेल ते बेलापूर रेल्वे स्थानक दरम्यान सेवा

तुर्भे : हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेल रेल्वे स्थानक येथे मुख्य पायाभूत सुविधा संबंधित कामांकरिता बेलापूर ते पनवेल रेल्वे स्थानक या दरम्यान ३० सप्टेंबर रोजी रात्री ११ पासून २ ऑवटोबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत ३८ तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला होता. या मेगाब्लॉक दरम्यान नवी मुंबई महापालिका आयुवत आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम (एनएमएमटी) मार्फत विशेष एनएमएमटी बस सेवा पुरवण्यात आली होती. या ‘एनएमएमटी' बस सेवेमुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला.

‘मेगाब्लॉक'च्या दोन दिवसांमध्ये दैनंदिन उत्पन्नापेक्षा सुमारे १८ लाख रुपयांपेक्षा अधिक अतिरिक्त रक्कम महापालिका परिवहन उपक्रमाच्या तिजोरीत जमा झाली आहे, अशी माहिती ‘महापालिका परिवहन उपक्रम'चे व्यवस्थापक योगेश कडुसकर यांनी दिली.

लोकल रेल्वे ‘मेगाब्लॉक'च्या दोन दिवसांमध्ये विशेष एनएमएमटी बससेवेसाठी सहाय्यक वाहतुक अधिक्षक, वाहक, चालक, नियंत्रक, मार्ग तपासणीस, सहाय्यक वाहतुक निरीक्षक, तिकीट तपासणीस आदी १८० पेक्षा अधिक कर्मचारी आणि अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली होती. यासाठी अनेक कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या होत्या, अशी माहिती ‘महापालिका परिवहन उपक्रम'चे मुख्य वाहतुक अधीक्षक उमाकांत जंगले यांनी दिली.

पनवेल ते बेलापूर रेल्वे स्थानक दरम्यान दुरुस्तीच्या कामासाठी ३० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पनवेल ते बेलापूर दरम्यान लोकल रेल्वे सेवा बंद होती. प्रवाशांच्या सोयीसाठी या मार्गावर एनएमएमटी द्वारे २८ एनएमएमटी बस उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. यामध्ये पहिल्या दिवशी पनवेल ते बेलापूर रेल्वे स्थानक दरम्यानच्या एकूण २३३ फेऱ्या झाल्या. याशिवाय पनवेल ते बेलापूर महामार्गापर्यंत आणि त्यापुढे मार्गस्थ झालेल्या एनएमएमटी बसच्या १८४ फेऱ्या झाल्या. तसेच २ ऑक्टोबर रोजी पनवेल ते बेलापूर दरम्यान एनएमएमटी बसच्या ४८६ फेऱ्या झाल्या. यामुळे प्रतिदिन ९ लाख रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न ‘महापालिका परिवहन उपक्रम'ला प्राप्त झाले.

इतर वेळी सुट्टीच्या दिवशी एनएमएमटी बस संचालनातून ‘महापालिका परिवहन उपक्रम'ला सुमारे २७ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होत असते. मात्र, लोकल रेल्वे ‘मेगाब्लॉक'च्या दोन दिवसांमध्ये सुट्टीच्या दिवशी प्रतिदिन ३५ ते ३७ लाख रुपये इतके उत्पन्न ‘महापालिका परिवहन उपक्रम'ला प्राप्त झाले आहे. -  योगेश कडुसकर, व्यवस्थापक - नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाहतूक पोलिसांची कार्यतत्परता !