अवैध फेरीवाल्यांकडून महापालिका सुरक्षा रक्षकांना मारहाण

दादागिरीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजार समोरील रस्त्यावर बसलेल्या अवैध फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या नवी मुंबई महापालिका सुरक्षा रक्षकांना बेकायदा फेरीवाल्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनामुळे नवी मुंबई शहरात अवैध फेरीवाल्यांची दादागिरी पुन्हा एकदा वाढत चालली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस अनधिकृत फेरीवाल्यांचे बस्तान वाढत चालले आहे. मात्र, आता महापालिका कर्मचाऱ्यांवर दादागिरी करत मारहाण करण्यापर्यंत अनधिकृत फेरीवाल्यांची मजल गेली असून, त्याचा प्रत्यय वाशी मध्ये आला आहे.

एपीएमसी फळ बाजार समोरील फुटपाथवर नेहमीच अवैध फेरीवाले फळ आणि भाजी विक्री करण्यासाठी बसतात. त्यामुळे या बेकायदा फेरीवाल्यांना उठवायला महापालिका अतिक्रमण विभागाचे पथक ३ ऑवटोबर रोजी गेले होते. यावेळी फळे विक्री करणाऱ्या  दोन महिलांनी धिंगाणा घालत महापालिका अतिक्रमण विभागातील सुरक्षा कर्मचारी महिलेला मारहाण केली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या सदर महिलांविरुध्द एपीएमसी पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे.

झोपडी बांधण्यास अटकाव केल्याने हुज्जत
वाशी सेक्टर-१९ मधील मोकळ्या सिडको भूखंडावर अनधिकृत झोपड्यांचे साम्राज्य पसरले आहे. ३ ऑक्टोबर रोजी वाशी सेक्टर-१९ मधील पुनित कॉर्नर समोर नवीन झोपडी बांधणाऱ्या नागरिकांना नवी मुंबई महापालिका सुरक्षा रक्षकांनी अटकाव केला. मात्र, यावेळी झोपडी धारकांनी महापालिका सुरक्षा रक्षकांसोबत हुज्जत घालत धक्काबुक्की केली. त्यामुळे एपीएमसी परिसरात अवैध फेरीवाले आणि झोपडीधारकांच्या वाढत्या दादागिरीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

लोकल रेल्वे मेगाब्लॉकमुळे ‘एनएमएमटी' मालामाल