‘अमृत कलश यात्रा'मधील संकलित माती जवानांकडे सुपूर्द

माझी माती माझा देश उपक्रम

पनवेल : पनवेल महापालिकेच्या वतीने आयुक्त  गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाच्या ‘माझी माती माझा देश' अभियान अंतर्गत ‘अमृत कलश यात्रा'मधील शहरस्तरीय माती संकलन १ ऑक्टोबर रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत नाट्यगृहात करण्यात आले. यावेळी चारही प्रभागातून विविध ‘अमृत कलश यात्रा'मधून गोळा करण्यात आलेली माती आयुक्त गणेश देशमुख आणि जवानांच्या हस्ते मोठ्या कलशात एकत्रित करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्वांनी ‘जय जवान जय किसान, भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या. सदर माती संकलन केलेला विशेष कलश पुढे दिल्लीला पाठविण्यात येणार आहे.

याप्रसंगी महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, अतिरिक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ.वैभव विधाते, उपायुक्त अभिषेक पराडकर, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, शहर अभियंता संजय जगताप, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, कार्यकारी अभियंता संजय जगताप यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच ‘केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल'चे अधिकारी सत्यनारायण आणि जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात महापालिकेच्या वतीने आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाच्या ‘माझी माती माझा देश' अभियानांतर्गत चारही प्रभागात प्रभाग स्तरीय ‘अमृत कलश यात्रा'चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये खारघर, कामोठे, कळंबोली, पनवेल येथील सुमारे ४ हजारहुन अधिक विद्यार्थ्यांनी घरोघरी माती आणि तांदळाचे दाणे गोळा करुन नागरिकांना या उपक्रमात सहभागी करुन घेतले होते. यावेळी भजनी मंडळ आणि ढोल ताशा अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात मोठ्या दिमाखात, उत्साहात ‘अमृत कलश यात्रा'चे आयोजन करण्यात आले होते.

‘अमृत कलश यात्रा'मध्ये चारही प्रभाग कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी, इंजिनिअरींग महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयाचे ‘एनएसएस'चे विद्यार्थी, प्राध्यापक तसेच माजी नगरसेवक, नागरिकांनी सहभागी झाले होते.

‘भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव'च्या समारोपानिमित्ताने संपूर्ण राज्यात आणि देशात ‘मेरी मिट्टी मेरा देश' अर्थात ‘माझी माती माझा देश' अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत पनवेल महापालिका तर्फे पंच प्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीराें का वंदन यासारखे उपक्रम घेण्यात आले. या ‘अभियान'चा शेवटचा उपक्रम म्हणजे अमृत कलश यात्रा. दिल्लीमध्ये हुतात्मा स्मारकाजवळ देशाच्या वीरांच्या स्मरणार्थ उभारलेल्या अमृत वाटिकेत या कलशांमधील माती आणि तांदूळ पेरुन या ठिकाणी ‘अमृत वाटिका' तयार करण्यात येणार आहे. यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून ७५०० कलशांमध्ये माती घेऊन ‘अमृत कलश यात्रा' काढण्यात येत असून ‘अमृत वाटिका' ‘एक भारत श्रेष्ठ भारत' या वचनबध्दतेचे प्रतिक असणार आहे. पनवेल महापालिकेने ‘अमृत कलश यात्रा'च्या माध्यमातून महापालिका कार्यक्षेत्रातून माती संकलन केलेला विशेष कलश महापालिकेच्या स्वयंसेविकांद्वारा दिल्लीला पाठविण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी दिली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 अवैध फेरीवाल्यांकडून महापालिका सुरक्षा रक्षकांना मारहाण