लिबू आवक मध्ये घट ; दरात वाढ

किरकोळ बाजारात ५ ते १० रुपयांना १ नग  

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) भाजीपाला बाजारात लिंबाची आवक कमी झाल्यामुळे लिंबाच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात ३ रुपयांना मिळणारा लिंबू आता ५ रुपयांना मिळत आहे. घाऊक बाजारात लिंबाचे दर दुप्पटीने वाढल्याने किरकोळ बाजारात देखील एक नग लिंबू पाच रुपये दराने विकला जात आहे. यापुढील कालावधीत लिंबू दर आणखी वधारण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून वातावरण बदल होत आहेत. मध्येच उन-पावसाचा खेळ सुरु आहे. कधी ढगाळ वातावरण तर कधी कडक उन्हाळा जाणवत आहे. या वातावरणाने हवेतील उष्मा देखील वाढत आहे. त्यामुळे शीतपेये, लिंबूपाणी पिण्याकडे अनेकांचा कल असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, बाजारात सध्या लिंबाची आवक घटल्याने लिंबू दर वाढण्यास सुरुवात झाली आहे.

वाशी मधील मुंबई कृषि उत्त्पन्न बाजार समिती मधील घाऊक भाजीपाला बाजारात सध्या राज्यातील जुन्नर, नगर मधून लिंबाची आवक होत आहे. ३ ऑवटोबर रोजी एपीएमसी भाजीपाला बाजारात लिंबाच्या १० गाड्या दाखल झाल्या असून, १७० क्विंटल आवक झाली आहे. शाकाहारी जेवण असो वा मांसाहारी, रोजच्या जेवणात लिंबाची आवश्यकता भासतेच. सध्या उनाचा तडाखा वाढल्याने लिंबू सरबताची मागणी देखील वाढली आहे. बाजारात सध्या आकाराने लहान लिंबाची आवक अधिक होत आहे. आकाराने मोठे असलेल्या लिंबाचे प्रमाण कमी आहे. आधी घाऊक एपीएमसी भाजीपाला बाजारात ८०० नग लिंबूची गोणी ५००-६०० रुपयांनी विक्री होत होती. मात्र, आता दरात दुप्पटीने वाढ झाली असून, ८०० नग लिंबूची गोणी १२०० रुपयांनी विक्री होत आहे.

घाऊक बाजारात दरवाढ झाल्याने किरकोळ बाजारात देखील लिंबू भाव खात आहे. आधी ५ रुपयांना ३ नग लिंबू उपलब्ध होते. मात्र, आता लिंबाचा एक नग ५ रुपयांना विक्री होत आहे. यापुढील कालावधीत लिंबू दर आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे मत व्यापारी बाळासाहेब दांगट यांनी व्यक्त केले आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांकांचे पुनर्नंबरीकरण